शीतलहरीमुळे गारठा कायम...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:34 IST2021-02-08T04:34:03+5:302021-02-08T04:34:03+5:30
सातारा : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून शीतलहरीमुळे थंडी कायम असून दिवसाही गारठा जाणवत असल्याने शेतीसह बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. ...

शीतलहरीमुळे गारठा कायम...
सातारा : जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून शीतलहरीमुळे थंडी कायम असून दिवसाही गारठा जाणवत असल्याने शेतीसह बाजारपेठेवर परिणाम झाला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील पारा १५ अंशाखाली कायम आहे.
जिल्ह्यात गेल्यावर्षी थंडीला वेळेत सुरुवात झाली. नोव्हेंबर महिन्यातच किमान तापमान १५ अंशाच्या खाली आले. तर दिवाळीच्या दरम्यान तापमान उतरून १२ अंशापर्यंत खाली आले होते. त्यामुळे गारठा चांगलाच वाढला होता. मात्र, यानंतर थंडीत सतत चढ-उतार होत होता. काही दिवस थंडी गायबही झाली. त्यावेळी किमान तापमान २१ अंशावरही गेले होते. त्यानंतरही थंडीच्या प्रमाणात सतत चढ-उतार सुरू होता. असे असलेतरी डिसेंबर महिन्याच्या मध्यानंतर जिल्ह्यातील किमान तापमान १० अंशाखाली आले. तर सातारा शहरात एकवेळ ९ अंश तापमानाची नोंद झाली होती. दोन वर्षांतील हे नीच्चांकी तापमान ठरले होते.
डिसेंबर महिन्यात कमी तापमान होते. त्यामुळे पुन्हा थंडी कमी झाली. जानेवारी महिन्यातही थंडी कमीच राहिली. १५ ते १७ अंशादरम्यान सतत किमान तापमान होते. तर फेब्रुवारी महिना सुरू झाल्यानंतर गार हवा वाहू लागली आहे. त्यातच किमान तापमानही कमी झाल्यामुळे थंडीत वाढ झाली आहे. मागील काही दिवसांपासून तर शीतलहरीमुळे हवेत चांगलाच गारठा जाणवत आहे. सायंकाळी पाचपासूनच थंडी जाणवते. तर सकाळीही १२ पर्यंत अंगातून थंडी जात नाही, अशी स्थिती आहे.
चौकट :
सातारा शहरातील किमान तापमान असे :
दि. २६ जानेवारी १५.०७, दि. २७ जानेवारी १४.०६, दि. २८ जानेवारी १४.०२, दि. २९ जानेवारी १४.०७, दि. ३० जानेवारी १४.०६ आणि ३१ जानेवारी १५.०१, दि. १ फेब्रुवारी १५, दि. २ फेब्रुवारी १७.०२, दि. ३ फेब्रुवारी १२.०९, ४ फेब्रुवारी १२.०१, ५ फेब्रुवारी १३.०५, दि. ६ आणि ७ फेब्रुवारी १४.०९.
......................................................