आचारसंहितेमुळे गादीवरील कार्यकर्ते आले सतरंजीवर
By Admin | Updated: October 19, 2016 22:44 IST2016-10-19T22:44:50+5:302016-10-19T22:44:50+5:30
नेत्यांनी घेतली धास्ती : राजकीय गुफ्तगू आता खासगी जागेत--पालिका निवडणूक आचारसंहितेचा फलक

आचारसंहितेमुळे गादीवरील कार्यकर्ते आले सतरंजीवर
सातारा : राज्यातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे. त्यामुळे शासकीय विश्रामगृह येथे बैठका, चर्चा व प्रवेश करण्यास राजकीय नेत्यांना मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे सातारा शासकीय विश्रामगृहात आचारसंहितेमुळे गादीवरील कार्यकर्ते सतरंजीवर आल्याचे चित्र दिसू लागले आहे. आचारसंहितेच्या पहिल्याच दिवशी कोणताही राजकीय नेता विश्रामगृहात फिरकला नाही. एवढी धास्ती आचारसंहितेची घेतली आहे.
सातारा जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड, वाई, महाबळेश्वर, पाचगणी, रहिमतपूर, म्हसवड, फलटण नगरपालिका व पाटण, मेढा, दहिवडी, कोरेगाव, खंडाळा, वडूज या नगरपंचायती निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. आचारसंहितेमुळे नेहमीच शासकीय विश्रामगृह गजबलेले असते. खासदार, आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच माजी पदाधिकारी यांच्यासह राजकीय पदाधिकाऱ्यांची नेहमीच वर्दळ असते. काहीजणांचे वाहन विश्रामगृहात आल्यानंतर त्वरित त्यांच्यासाठी विश्रामगृहातील कक्ष उघडण्यात येतो. शासकीय अधिकारीसुद्धा या विश्रामगृहाचा पुरेपूर लाभ घेतात; पण सध्या आचारसंहितेमुळे राजकीय पटलावरील अनेकांना आता चौकातील हॉटेल, टपरी व दुकानाचा आसरा घ्यावा लागत आहे. (प्रतिनिधी)
विश्रामगृहात चिडीचूप शांतता
या आचारसंहितेच्या कालावधीत राजकीय नेत्यांना सक्त मनाई करण्याचे फलक दर्शनी भागात लावण्यात आले आहेत. त्यामुळे आजपासूनच शासकीय विश्रामगृहात शुकशुकाट जाणवत आहे. फक्त शासकीय अधिकारी, अधिस्वीकृती पत्रकार व शासनमान्य अतिमहत्त्वाच्या व्यक्ती यांच्यासाठी हे विश्रामगृह उपलब्ध होणार आहे, अशी माहिती मिळाली आहे.