ढोल-ताशांच्या तालावर लाडके गणराय आले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 23:22 IST2019-09-02T23:22:44+5:302019-09-02T23:22:48+5:30
सातारा : ढोल-ताशा आणि पारंपरिक वाद्याच्या तालावर विघ्नहर्त्या गणरायाचे सोमवारी ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत आगमन झाले. महागाई आणि दुष्काळाचे सावट ...

ढोल-ताशांच्या तालावर लाडके गणराय आले
सातारा : ढोल-ताशा आणि पारंपरिक वाद्याच्या तालावर विघ्नहर्त्या गणरायाचे सोमवारी ढोल-ताशांच्या गजरात वाजतगाजत आगमन झाले. महागाई आणि दुष्काळाचे सावट असतानाही लाडक्या गणरायाचे भक्तांनी उत्साहात स्वागत केले. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता.
सकाळपासून बॉम्बे रेस्टॉरंट परिसर, राजवाडा परिसरातील दुकानांमधून श्रींची मूर्ती खरेदी करण्यासाठी आबालवृद्धांनी मोठ्या भक्तिभावाने लाडक्या बाप्पांना वाजतगाजत आपल्या घरी विराजमान केले. मोठ-मोठ्या मूर्ती खरेदी करणाऱ्या मंडळांच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टर-ट्रॉलीतून गणरायाची मूर्ती ढोल-ताशांच्या तालावर नाचत आणि गुलालाची उधळण करीत मंडळांच्या ठिकाणी विराजमान केल्या. डोक्यावर गणपती बाप्पा मोरया गिरवलेली टोपी, कपाळावर भगवी पट्टी आणि गुलालाची उधळण करीत हातात, डोक्यावर मूर्ती घेतलेल्या गणेशभक्तांच्या चेहºयावर बाप्पांच्या आगमनाचा आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. तर प्रत्येक रिक्षा आणि वाहनांत ‘ताशाचा आवाज तरारारा झाला रे गणपती माझा नाचत आला’ हे गाणे भक्तांच्या आनंदात भर घालताना दिसत होते.
खणआळी रस्त्यावर दुतर्फा गणेशाच्या पूजेचे साहित्य विक्री करणारी दुकाने थाटली होती. यात पाच प्रकारची फळे आणि गणरायाच्या मखरीसाठी लागणारे सजावटीचे साहित्य विक्री करणाºया दुकानांच्या रांगा लागल्या होत्या. या रांगांतून वाट काढत गणेशभक्त आवडत्या श्रींची मूर्ती खरेदी करण्यासाठी मैदानाकडे जात होते. त्यामुळे दुचाकी वाहने आणि भाविकांची एकच झुंबड पाहायला मिळाली. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.