जनावरांची औषधे धूळखात !
By Admin | Updated: November 20, 2015 00:07 IST2015-11-19T21:40:49+5:302015-11-20T00:07:46+5:30
मुकी जितराब धोक्यात : राजवाड्यावरील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या रुग्णालयातील दयनीय स्थिती

जनावरांची औषधे धूळखात !
सातारा : राजवाडा येथील जिल्हा परिषद, पंचायत समिती सातारा यांच्या पशू वैद्यकीय दवाखान्यामधील औषधे गोडाऊनमध्ये धूळखात पडले असून, यामध्येच औषधी पोती बॉक्स ठेवली गेली आहेत. त्यामुळे पशूंना संजीवनी देणारे या औषधांचा पशूंना कितपत फायदा होईल यावर शेतकऱ्यांना शंका येऊ लागली आहे.
जिल्हा परिषदेतर्फे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पशू वैद्यकीय दवाखाने सुरू आहेत. त्यापैकी साताऱ्यातील राजवाडा परिसरातील दवाखान्याची व्यवस्था असून, या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग पशूंच्या औषधोपचारासाठी येतो; परंतु सध्या या दवाखान्यामधील परिसरातील स्वच्छतेचे तीन-तेरा वाजले आहेत. दरवाजाच्या काना-कोपऱ्यात मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तर याच दवाखान्याच्या मधोमधी असलेल्या वस्तुला औषधी पोती बॉक्स ठेवण्यासाठी गोडाऊन म्हणून वापर करीत आहे.
या गोडाऊनला सर्वत्र खिडक्या असून, संपूर्ण खिडक्यांना तावदान नसल्याने हवेने येणारा कचरा, माती हे या औषधांवर बसत असल्याने या गोडाऊनमधील औषधी वस्तू, पोती, बॉक्स ही धुळीने माखली आहेत. तर गोडाऊनमध्ये सर्वत्र जाळ्या पसरल्या आहेत. असे असताना हे औषध जनावरांना लाभदायी ठरेल का? असा प्रश्न येथे येणाऱ्यांना पडला आहे.
दरम्यान, दवाखान्यातील परिसराबरोबर येथील पाणी व्यवस्थाही अत्यंत बिकट असल्याचे निदर्शनास येते. येथील हौद हा रिकामाच पडला आहे. (प्रतिनिधी)
म्हणे कर्मचारीच नाहीत!
याविषयी संबंधितांशी बोलले असता, त्यांनी सांगितले की, ‘दिवाळीच्या सुट्टीमुळे कर्मचारी आले नाहीत. पालिकेला स्वच्छतेसाठी कर्मचारी मागितले असून, ते लवकरच या ठिकाणी कर्मचारी पाठवून देणार असून, याची तातडीने स्वच्छता करून घेतली जाईल, असे सांगण्यात आले.’