तालुक्यात दुष्काळ; पण महिला सदस्या दौऱ्यावर!
By Admin | Updated: May 24, 2016 00:57 IST2016-05-23T21:54:01+5:302016-05-24T00:57:15+5:30
जनतेच्या प्रश्नावर चर्चा करणार कोण? : जलयुक्त कामांची मंजुरी जानेवारीत घेण्याचा ठराव; वीजवितरण, आरोग्य, कृषी विभागांवर ताशेरे--कऱ्हाड पंचायत समिती सभा

तालुक्यात दुष्काळ; पण महिला सदस्या दौऱ्यावर!
कऱ्हाड : तालुक्यात सध्या अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अशा दुष्काळी परिस्थितीमध्ये तालुक्यातील टंचाईच्या प्रश्नांवर चर्चा करण्याऐवजी तसेच त्यावर उपाययोजना आखण्याऐवजी उत्तर भारतात अभ्यास दौरा करण्यासाठी पंचायत समितीमधील महिला सदस्या रवाना झाल्या. तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असताना अभ्यास दौरा करण्यासाठी सदस्या गेल्याचा हा प्रकार सोमवारी पार पडलेल्या पंचायत समितीच्या सभेदरम्यान उघडकीस आला. अशा प्रकारे दुष्काळी परिस्थितीत आयोजित केलेल्या दौऱ्यातून महिला सदस्या नक्की कोणता अभ्यास करणार अशी चर्चा अधिकाऱ्यांमध्ये केली जात होती. कऱ्हाड पंचायत समितीची मासिक सभा येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात सोमवारी पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती देवराज पाटील होते. तर गटविकास अधिकारी अविनाश फडतरे उपस्थित होते.
दुष्काळी परिस्थितीत पार पडलेल्या या मासिक सभेत जलयुक्त शिवार योजनेतील कामांच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येणाऱ्या प्रस्तावाचा कालावधी वाढविण्याचा ठराव सर्वानुमते मांडण्यात आला. तर प्रशासनातील कामांबाबत उदासीनता, वेळेबाबत पाळल्या न जाणाऱ्या सूचना आदींवरून वीज वितरण विभागावर ताशेरे ओढण्यात आले. उंब्रज येथे बिनटाका शस्त्रक्रिया शिबिराप्रसंगी रुग्णांना आलेल्या अनेक समस्या, त्यांच्याकडून आलेल्या तक्रारीवरून आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांवर सदस्यांनी आगपाखड केली. तर योजनांबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केली जात असल्या कारणावरून कृषी विभागातील अधिकाऱ्यांना सभापती पाटील यांनी धारेवर धरले.
येथील पंचायत समितीच्या सभेच्या सुरुवातीस तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर जी चर्चा होणे गरजेचे होते. ती होण्याऐवजी अधिकाऱ्यांकडून सभेस उशिरा येणे, कामांबाबत दिरंगाई करणे, वर्षानुवर्षे काम न करणे आदी विषयी चर्चा करण्यात आली. सभेदरम्यान तालुका कृषी अधिकारी खरात यांनी कृषी विभागाचा आढावा सादर केला. ‘मागेल त्याला शेततळी देणे’ या योजनेअंतर्गत तालुक्यातील चाळीस प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले आहे. तालुक्यातील १३ गावांचा ३० कोटींचा आराखडा हा शासनाकडे पाठविला असून, त्यातील ८ कोटींच्या कामांचा आराखडा हा शासनाकडून प्रस्तावित करण्यात आला असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी खरात यांनी दिली. यावर अधिकाऱ्यांनी तालुक्यातील कामांबाबत नियोजन करण्यापेक्षा कामे करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे अगोदर कामे करा, अशा सूचना सभापती देवराज पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. १७ जून पर्यंत शासनाची कामे पूर्ण करणे महत्त्वाचे असताना अजूनही विभागांकडून कामे कशा प्रकारे करायची याचे नियोजन केले जात असल्याची माहिती सभापती देवराज पाटील यांनी सभागृहास दिली.
यावेळी सदस्य भाऊसाहेब चव्हाण यांनी जलयुक्त शिवार कामांच्या मंजुरीसाठी प्रस्ताव हे सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये पाठविण्यात येतात. त्यामुळे उशिरा मंजुरी मिळते. असे करण्याऐवजी तत्काळ कामांना मंजुरी मिळण्यासाठी जानेवारीत कामांच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात यावा. तसा ठराव मंजूर करावा, अशी मागणी केली. त्यावर सभापती देवराज पाटील यांनी ठरावाला मंजुरी दिली. यानंतर वीज वितरण विभागातील अधिकाऱ्यांनी आढावा सादर केला असता सदस्या अनिता निकम यांनी वीज वितरण कंपनीतील अधिकाऱ्यांकडून वेळेवर कामे केली जात नाहीत. यातील अधिकाऱ्यांनी आपली कामातील जबाबदारी आळेखून काम केले पाहिजे. मासिक मीटिंगला उशिरा उपस्थित न राहता वेळेवर राहायला शिकले पाहिजे, अशा शब्दात अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले. तालुक्यातील म्हारूगडेवाडी येथे नियमितपणे पाणीपुरवठा करण्याच्या सूचना सभापती देवराज पाटील यांनी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी एम. डी. आरळेकर यांना दिल्या. (प्रतिनिधी)
अभ्यास दौऱ्याच्या शुभेच्छा
कऱ्हाड तालुक्यात एकीकडे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असताना तालुक्यातील प्रश्नांवर, समस्यांवर चर्चा करण्याऐवजी महिला सदस्या या सभा मध्यावरच सोडून निघून गेल्या. सभेदरम्यान महिला सदस्यांना कधी अभ्यास दौऱ्यांना जातो याची घाई लागून राहिली होती. अखेर एक तास चर्चा केल्यानंतर दुपारी दोन वाजता महिला सदस्यांनी सभागृह सोडले. यावेळी अनेकांनी सभा सुरू असतानाच त्यांना शुभेच्छा दिल्या.