साताऱ्यात अनोखी खड्डे चुकवून वाहन चालवा स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:41 IST2021-03-23T04:41:39+5:302021-03-23T04:41:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : पोवई नाका-सिव्हिल हॉस्पिटल रोड-ते सदर बाझार या रस्त्याची अवस्था सुधारण्याबाबत नगरपालिका प्रशासन, नगरसेवक, पदाधिकारी ...

साताऱ्यात अनोखी खड्डे चुकवून वाहन चालवा स्पर्धा
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : पोवई नाका-सिव्हिल हॉस्पिटल रोड-ते सदर बाझार या रस्त्याची अवस्था सुधारण्याबाबत नगरपालिका प्रशासन, नगरसेवक, पदाधिकारी यांना विनंती करूनही या प्रश्नाकडे लक्ष द्यायला कोणीही तयार नाही. त्यामुळे झोपेचे साेंग घेतलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी अनोखी खड्डे मोजा व खड्डे चुकवून वाहन चालवण्याची स्पर्धा सदर बाझार येथील नागरिकांतर्फे आयोजित केली आहे.
सामाजिक कार्यकर्ते विकास धुमाळ यांनी या स्पर्धेची घोषणा केली. दरम्यान, या स्पर्धेची प्रशासनाने दखल न घेतल्यास या रस्त्यावरील खड्डयात स्पर्धेत सहभागी नागरिकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
पोवई नाका-सिव्हिल हॉस्पिटल रोड ते सदर बाझार दरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण होईल तेव्हा होईल, त्यापूर्वी खड्डयांचे पँचिंग वर्क तरी करा, अशी मागणी नागरिकांची आहे. हे काम करण्यासाठी नगरपालिका प्रशासन, पदाधिकारी व नगरसेवकांकडे सातत्याने पाठपुरावा करूनही त्याकडे कोणीही लक्ष दिलेले नाही. या रस्त्यावर नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते. रस्त्यावरील खड्डयांतून प्रवास करताना वाहने नादुरूस्त होत आहेत. रिक्षाचे नुकसान होत आहे. चालक या रस्त्याची अवस्था पाहून दुसऱ्या मार्गाचा वापर करत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना अर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. दुचाकीस्वार, महिला व नागरिकांना पाठदुखीचा त्रास होऊ लागला आहे. या मार्गावर दररोज छोटे अपघात होत आहेत. शहरातील हा महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्याकडेलाच जिल्हा रूग्णालयासह महत्त्वाची रुग्णालये, शासकीय कार्यालये, शाळा आहेत तरीही रस्ता दुरूस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. रस्ता दुरूस्त होणे गरजेचे आहे. त्यामुळे झोपेचे सोंग घेतलेल्या नगरपालिका प्रशासनाला जागे करण्यासाठी ही स्पर्धा ओयोजित केली आहे. यासाठी ५,००१ रुपयांचे बक्षीस ठेवले आहे. या स्पर्धेचे बक्षीस वितरण नगरपालिका प्रशासनासह पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्याचा मानस असल्याचे विकास धुमाळ यांनी सांगितले.