सातारा विश्रामगृहासमोरच पिण्याच्या जलवाहिनीला गळती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:39 IST2021-03-16T04:39:10+5:302021-03-16T04:39:10+5:30
करंजे : सातारा येथील जुन्या आरटीओ चौकातील पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनला गळती सुरू आहे. उन्हाळा तोंडावर असल्याने भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी ...

सातारा विश्रामगृहासमोरच पिण्याच्या जलवाहिनीला गळती
करंजे : सातारा येथील जुन्या आरटीओ चौकातील पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनला गळती सुरू आहे. उन्हाळा तोंडावर असल्याने भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी पाण्याची बचत करण्याची गरज निर्माण झालेली आहे. त्यातच अशाप्रकारे पाणी वाहून जात असल्याने नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत माहिती अशी की, सदरबजार येथील जुन्या आरटीओ चौकातील रेस्ट हाऊससमोर पिण्याच्या जलवाहिनीला गळती लागलेली आहे. यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. रस्त्याच्या बाजूला बऱ्याच अंतरावर पाणी वाहत असल्याने चिखल झाला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्याच्या कडेने चालता येत नाही. काही वेळेस दुचाकीसुद्धा या चिखलावरून जात असताना घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. विश्रामगृहातील शासकीय अधिकारी यांच्या दारातच गळती बऱ्याच दिवसांपासून होत आहे. तरीदेखील याकडे पाणीपुरवठा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
शासकीय अधिकारी यांच्या दारातील गळतीकडे दुर्लक्ष होत असेल तर सर्वसामान्य जनतेच्या समस्यांकडे प्रशासन कितपत लक्ष देत असेल, असा प्रश्न साताऱ्यातील जनतेला पडत आहे. आधीच कडक उन्हाळ्यामुळे पाणीप्रश्न समोर असताना आहे त्या उपलब्ध पाणीसाठ्यातून असे पाणी वाया जाणे ही बाब पुढील काही महिन्यांत किती मोठी समस्या आहे हे लक्षात येईल. पाणीपुरवठा विभागाने त्वरित पाइपलाइनची गळती काढून वाया जाणारे पाणी थांबवावे, अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.