जिल्हा परिषद होण्याचे स्वप्न भंगले!
By Admin | Updated: September 7, 2016 23:54 IST2016-09-07T21:37:26+5:302016-09-07T23:54:53+5:30
अनेकांना हुरहुर : बुध गट रद्द झाल्याच्या चर्चेने अनेकांचे पानिपत

जिल्हा परिषद होण्याचे स्वप्न भंगले!
बुध : खटाव तालुक्याच्या दक्षिणेला भला मोठा असणार जिल्हा परिषद गट म्हणजे बुध जिल्हा परिषद गट. पण पुनर्रचनेमध्ये बुध गट रद्द होऊन पुसेगाव नवीन गट झाल्याची चर्चा गेल्या आठवडाभर सुरू झाल्याने अनेकांचे भावी जिल्हा परिषद सदस्य होण्याचे स्वप्न भंगले असून, आता पंचायत समितीवरच समाधान मानावे लागणार असल्याने बुध जिल्हा परिषद गटातील विविध पक्षांतील अनेक मातब्बरांचे या गट पुनर्रचनेमुळे पानिपत होणार का हे येणारा काळच ठरवणार आहे.
मांजरवाडीपासून रेवलकरवाडीच्या डोंगररांगांपर्यंत विस्तृत लहान सहान वाड्या वस्त्यांचा जिल्हा परिषद गट म्हणून बुध गट ओळखला जात होता. अनेकांनी या गटावरती आपले निर्विवाद वर्चस्व निर्माण करण्यासाठी राजकारणाची अनेक दशके खर्च केली. काहींच्या कपाळाला गुलाल लागला तर काहींच्या नशिबी दोन-दोन वेळा अपयश आले; पण तरीही मोठ्या जिद्दीने कोणतीही उमेद न हारता आपल्या कार्यकर्त्यांचा गट सांभाळत आपले राजकारण जिल्हा परिषद गटाची सत्ता नसतानाही शाबूत ठेवले. पण गेल्या आठवड्यापासून बुध जिल्हा परिषद गट रद्द झाल्याच्या बातम्यांनी अनेकांची झोप उडवली.
जिल्हा परिषद गट असणारा बुध आता पंचायत समितीचा गण झाला. विसापूरचा मोठा भाग जाऊन पुसेगाव हे मोठे गाव मिळून पुसेगाव जिल्हा परिषद गट अस्तित्वात येणार असल्याच्या चर्चेने गेल्या तीन-चार वर्षांपासून जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी लावलेली फिल्डिंग वाया जाणार की काय याची भीती अनेकांना वाटू लागली आहे. ‘तुम्ही मला झेड.पी ला सहकार्य करा मी तुम्हाला पंचायत समितीला सहकार्य करतो,’ असे म्हणत अनेकांनी आपल्या जोड्या तयार केल्या होत्या, पण आता ही लावलेली फिल्डिंग ही काहीच कामाची राहिली नाही त्यामुळे जिल्हा परिषदसाठी इच्छुक असलेल्यांना आता पंचायत समिती सदस्यसाठी तयारी करावी लागणार असल्याने येथे मोठी स्पर्धा करावी लागणार असल्याचे चित्र आहे. (वार्ताहर)
मोळ, डिस्कळ, ललगुण, नागनाथवाडी, बुध, राजापूर, वेटणे, रणशिंगवाडी मधील अनेकांना रोज पुसेगावला शिक्षण, व्यापार, खरेदीसाठी यावे लागते. त्यामुळे आता या गावातील मतदारांची मर्जी विशेष करून राखली जाणार आहे.
या गावातील आजी-माजी सरपंच, उपसरपंचांना पुसेगावमधील नेत्यांच्या उठबस चालू झाली आहे. त्यामुळे भविष्यात पुसेगाव हे खटाव तालुक्याच्या उत्तर भागाचे केंद्र राहणार असल्याने जुन्या बुध जिल्हा परिषद गटातील नेत्यांनी पुसेगावच्या कलेने घ्यावे लागणार आहे.
पुसेगावमधील इच्छुकांनी आपल्या जोडीला बुध पंचायत समिती गणातील उमेदवारांचा शोध घेण्याची सुरुवात केली आहे. हे सारे होत असताना गट पुनर्रचनेबरोबर सर्वात महत्त्वाचे आरक्षण ही असणार आहे, जर बुध पंचायत समिती गणावर खुले आरक्षण न पडल्यास पुढील पाच वर्षांनीच संधी मिळणार का या धास्तीने अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत.
पुसेगाव हे सात ते आठ हजार मतदार असणारे गाव जोडल्याने जिल्हा परिषदसाठी पुसेगावमधील उमेदवारीची दावेदारी प्रबळ असल्याने वरच्या गावातून थोडीफार मते मिळाली तरी पुसेगावकरांची डाळ सहज शिजणार असल्याने मोळपासून बुधपर्यंतच्या इच्छुकांनी आता पंचायत समिती सदस्य होण्यासाठी हालचाली करण्यास सुरुवात केली आहे.