अपघाताने भंगले सहजीवनाचे स्वप्न

By Admin | Updated: June 7, 2015 00:28 IST2015-06-07T00:27:58+5:302015-06-07T00:28:00+5:30

पती-पत्नीची कायमची ताटातूट : शास्त्रज्ञ बनसोडे यांचा आयर्लंडमध्ये अपघाती मृत्यू

Dream of accidentally broken cosmos | अपघाताने भंगले सहजीवनाचे स्वप्न

अपघाताने भंगले सहजीवनाचे स्वप्न

भुर्इंज : दोघेही अतिशय गरीब कुटुंबातील. मात्र केवळ बुद्धिमत्तेच्या जोरावर आंतरराष्ट्रीय पातळीवर संशोधन क्षेत्रात प्रचंड यश प्राप्त करुन शास्त्रज्ञ म्हणून ख्याती प्राप्त केली. त्यासाठी लग्नाआधी दोघांनी प्रचंड अभ्यास केला. खडतर परिश्रमही घेतले. आणि लग्नानंतरही दोघेही दोन टोकांवर विविध देशात राहून ज्ञानसाधना करत होते. तब्बल पाच वर्षांच्या वैवाहिक जीवनात नुकतेच कुठे खऱ्या अर्थाने सहजीवन सुरू झाले होते. पण नियतीलाच ते मान्य नसावे. भुर्इंज येथील सुकन्या व स्वित्झर्लंड येथील बर्न विद्यापीठात संशोधन करणारी शास्त्रज्ञ डॉ. मेघा लोखंडे व त्यांचे पती शास्त्रज्ञ डॉ. विजय बनसोडे या दोघांचा आयर्लंडमध्ये अपघात झाला. यामध्ये डॉ. बनसोडे यांचा मृत्यू झाला. सहजीवनाची स्वप्न साकारताना नियतीने या दांम्पत्याची कायमची ताटातूट केली अन् सहजीवनाचे स्वप्न भंग पावले. हा अपघात म्हणजे नियतीच्या निष्ठूरतेची परिसिमाच म्हणावी लागेल.
मेघा ही भुर्इंज येथील अतिशय गरीब अशा लोखंडे कुटुंबात जन्मलेली मुलगी. तिचा विवाह पाच वर्षांपूर्वी बार्शी तालुक्यातील श्रीपत पिंंपरी गावच्या विजय बनसोडे यांच्याशी झाला. बनसोडे हेही अतिशय गरीब कुटुंबातील. पण दोघेही उच्चशिक्षित. लग्नानंतर अवघ्या एका महिन्यातच डॉ. विजय यांना शिष्यवृत्ती मिळाल्याने त्यांना आयर्लंड येथील विद्यापीठात दाखल व्हावे लागले. त्यावेळी मेघा भारतातच होती. तत्पूर्वी डॉ. विजय यांनी पुणे येथील राष्ट्रीय एड्स अनुसंधान संस्था येथे रिसर्च फेलो म्हणून काम केले. तसेच पुणे येथे दोन वर्ष अध्यापक म्हणूनही काम केले.
या काळात त्यांना विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरांवरील परीक्षांमध्ये यश मिळत गेले. त्यांची संशोधनातील हुशारी पाहून आयर्लंड येथील राष्ट्रीय विद्यापीठाने संशोधनासाठी त्यांना आमंत्रित केले. डॉ. मेघा यांनीही पाठिंंबा दिला आणि त्यामुळेच विवाहानंतर अवघ्या एका महिन्यात डॉ. विजय परदेशी गेले. त्याकाळात मेघा यांनीही संशोधन क्षेत्रात भरारी घेतली. त्यांच्या या संशोधनाची दखल घेऊन त्यांनाही स्पेन येथील विद्यापीठाने संशोधनासाठी आमंत्रित केले. अशा तऱ्हेने हे दोघेही दोन टोकांवर होते. दोघांनीही आपापल्या क्षेत्रात प्रचंड नाव कमावले. अनेक शिष्यवृत्या प्राप्त केल्या. अवघ्या काही महिन्यांपूर्वी दोघेही स्वित्झर्लंडमधील बर्न विद्यापीठात एकत्र आले. येथूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या सहजीवनाला प्रारंभ झाला होता. मात्र, एका अपघातात डॉ. विजय यांचा मृत्यू झाला.
या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून डॉ. मेघा यांना पतीचा मृतदेह भारतात आणताना काय यातना सहन कराव्या लागल्या असतील या जाणीवनेच अनेकांच्या डोळ्यात पाणी येत आहे.
संशोधनासाठी लग्नानंतरही दुरावा
मेघा यांनीही संशोधन क्षेत्रात भरारी घेतली. त्यांच्या या संशोधनाची दखल घेऊन त्यांनाही स्पेन येथील विद्यापीठाने संशोधनासाठी आमंत्रित केले. अशा तऱ्हेने हे दोघेही दोन टोकांवर होते. अवघ्या काही महिन्यांपूर्वी दोघेही स्वित्झर्लंडमधील बर्न विद्यापीठात एकत्र आले. ‘मेड फॉर इच अदर’ अशी या दाम्पत्याची त्यांच्या मित्र-मैत्रिणींमध्ये ओळख होती. मात्र ३ दिवसांपूर्वी आयर्लंडमध्ये दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात डॉ. विजय यांचा मृत्यू झाल्याने या सुखी सहजीवनाची सुरुवात अल्पायुषी ठरली.

Web Title: Dream of accidentally broken cosmos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.