जिल्हा नियोजनचा प्रारुप आराखडा ४८५.९० कोटींचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:08 IST2021-02-05T09:08:14+5:302021-02-05T09:08:14+5:30

सातारा : तब्बल सात वर्षाच्या कालावधीनंतर झालेल्या जिल्हा नियोजनाच्या बैठकीत २०२१-२२ जिल्हा वार्षिक योजनेसाठी १४० कोटींच्या वाढीव ...

Draft plan of district planning of 485.90 crores | जिल्हा नियोजनचा प्रारुप आराखडा ४८५.९० कोटींचा

जिल्हा नियोजनचा प्रारुप आराखडा ४८५.९० कोटींचा

सातारा : तब्बल सात वर्षाच्या कालावधीनंतर झालेल्या जिल्हा नियोजनाच्या बैठकीत २०२१-२२ जिल्हा वार्षिक योजनेसाठी १४० कोटींच्या वाढीव मागणीसह ४८५.९० कोटींच्या प्रारुप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीने मान्यता दिली.

जिल्हा वार्षिक योजनेची सन २०२१-२२ च्या प्रारुप आराखडा मंजुरीची बैठक सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली.

जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात शुक्रवारी झालेल्या आयोजित बैठकीला वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार दीपक चव्हाण, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा, जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे, यांच्यासह विविध विभागांचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते.

सन २०२१-२२ साठी राज्यस्तरीय समितीच्या शिफारशीसाठी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेसाठी १४० कोटींच्या वाढीव मागणीसह ४०४.४९ कोटींची, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी ७९.८३ कोटी तर आदिवासी क्षेत्र बाह्य उपयोजनेसाठी १.५८ कोटी इतक्या प्रारुप आराखड्यास जिल्हा नियोजन समितीच्या वतीने मान्यता देण्यात आली.

आयत्या वेळच्या विषयामध्ये उंब्रज ता. कऱ्हाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणी वर्धनाने ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करणे, मौजे मारुल हवेली ता. पाटण व कोपर्डे हवेली ता. कऱ्हाड येथे खास बाब म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मंजुरीसाठीचा प्रस्ताव, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र बांधणे व विस्तारीकरण करण्याचा प्रस्ताव, बा.सी. मर्ढेकर यांच्या मेर्ढे ता. सातारा या गावास क वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळण्याचा प्रस्ताव, सिद्धेश्वर देवस्थान मारुल हवेली, वडजाई देवी देवस्थान वडजल ता. माण, श्री जोम मल्लिकार्जुन देवालय वाघावळे ता. महाबळेश्वर या स्थळांना क वर्ग यात्रा स्थळांचा दर्जा देण्याबरोबर जिल्हा मार्ग विकास व मजबुतीकरण कामाबाबत तसेच सन २०१९-२० च्या मंजूर आराखड्यातील तांत्रिक मान्यता प्राप्त असलेली प्रास्तावित कामे व सन २०२०-२१ च्या आराखड्याबाहेरील कामे आराखड्यात समाविष्ट करण्याबाबत सभागृहात सदस्यांसोबत चर्चा होऊन मान्यता देण्यात आली.

तसेच विविध विभागांकडील २०२०-२१ जिल्हा वार्षिक योजनेमधील नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या प्रस्तावांवर सभागृहात चर्चा होऊन मान्यता देण्यात आली.

चौकट

सामाजिक अंतर ठेवून पार पडली सभा

सातारा येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहामध्ये जिल्हा नियोजन समितीची सभा पार पडली. या सभेमध्ये सदस्यांनी सुरक्षित सामाजिक अंतर ठेवले होते.

फोटो ओळ : सातारा येथे जिल्हा नियोजन समितीच्या झालेल्या सभेत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह आदींची उपस्थिती होती.

Web Title: Draft plan of district planning of 485.90 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.