रस्ताच गायब झालेल्या टोळेवाडीला आश्वासनांची डब्बल ऑफर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:45 IST2021-09-04T04:45:55+5:302021-09-04T04:45:55+5:30
पाटण : पाटण शहरापासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या टोळेवाडी या डोंगरावरील गावाचा रस्ताच भूस्खलनामध्ये गायब ...

रस्ताच गायब झालेल्या टोळेवाडीला आश्वासनांची डब्बल ऑफर!
पाटण : पाटण शहरापासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या टोळेवाडी या डोंगरावरील गावाचा रस्ताच भूस्खलनामध्ये गायब झाला. या घटनेला जवळपास दीड महिना पूर्ण होत आला आहे. सध्या या गावातील जनतेची मैलोनमैल पायपीट सुरू आहे. नवीन रस्ता कुठून कसा काढायचा की या गावाचे पुनर्वसन करायचे, याबाबत तालुक्यातील दोन्ही नेत्यांनी आश्वासने दिली आहेत. परंतु मार्ग निघेपर्यंत टोळेवाडीकरांना आणखी किती दिवस किती महिने पायपीट करावी लागेल, हे अनिश्चित काळासाठी सांगता येत नाही.
टोळेवाडी हे गाव पूर्वीपासून माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांना मानणारे असे असले तरी काही दिवसांपूर्वीच या गावातील उपसरपंच आणि काही मंडळींनी शंभूराज देसाई यांच्याकडे जाहीर प्रवेश केला. त्यामागचा उद्देश हाच असेल की, वाहून गेलेला रस्ता नवीन झाला पाहिजे. सत्यजित पाटणकर यांनीही भूस्खलन झालेल्या टोळेवाडीला भेट देऊन ग्रामस्थांची विचारपूस केली होती.
सध्याची परिस्थिती विचारात घेता, टोळेवाडीसहित घेरादातेगड, ढेरू गडेवाडी, विठ्ठलवाडी या वस्त्यांमधील लोक मुख्य रस्ताच वाहून गेल्यामुळे पाटणकडे ये-जा करताना पायपीट करत आहेत. पाटणकडून टोळेवाडीकडे जाताना साधी दुचाकीही जाणार नाही, अशा रस्त्याची अवस्था झाली आहे.
त्यामुळे टोळेवाडी परिसरातील लोक पूर्वी गुळगुळीत रस्त्यावरून जात होते. आता मात्र होत्याचं नव्हतं झाल्यामुळे डोंगरातून पायवाट काढून चालत जाताना डोळ्यातून अश्रू काढत आहेत.
कोट...टोळेवाडी गावच्या रस्ता खंडित झालेल्या समस्येवर तालुक्याचे दोन्ही नेते आणि जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांना निवेदने दिली आहेत. लवकरच तोडगा काढावा. सत्यजित पाटणकर यांनी टोळेवाडीपुढे पुनर्वसनाचा पर्याय ठेवला आहे. रस्ता काढायचा झाल्यास दुसऱ्या मार्गाचा अवलंब करावा लागेल, असे पाटणकर यांनी सांगितले.
- नारायण डिगे, माजी सरपंच
कोट..
टोळेवाडी गावावर आलेल्या संकटातून मार्ग काढण्यासाठी आम्ही गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे गेलो. त्यांनी पूर्वीचा रस्ता होता, त्या परिसरातूनच नवीन रस्ता करून देणार, असे आश्वासन दिले आहे. गावच्या विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आम्ही शंभूराज देसाई यांचे नेतृत्व मान्य केले आहे.
-
दिव्या साळुंखे,
उपसरपंच, टोळेवाडी
०३पाटण
पाटण शहरापासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या टोळेवाडी या डोंगरावरील गावाचा रस्ताच भूस्खलनामध्ये गायब झाला.