पोस्ट कार्यालयात जावई कर्मचाऱ्याला धोंडेदान

By Admin | Updated: July 15, 2015 00:21 IST2015-07-14T22:04:50+5:302015-07-15T00:21:42+5:30

अनोखा सोहळा : ताटभर अनारसे सर्व कर्मचाऱ्यांनी केले फस्त

Dosaidan to the businessman in the post office | पोस्ट कार्यालयात जावई कर्मचाऱ्याला धोंडेदान

पोस्ट कार्यालयात जावई कर्मचाऱ्याला धोंडेदान

सातारा : त्यांचं नातं नाही रक्ताचं... पण एकत्र नोकरी करत असताना सर्वांचेच लाडके मामा बनलेले... झालं, ‘मामा अधिकमहिना सुरू आहे, बाकीच्या जावयांची बघा कशी मजा सुरू आहे, आम्हांला साधे अनारसे तरी द्या,’ असा लाडीक हट्ट केला गेला आणि आश्चर्य म्हणजे या मानलेल्या सासऱ्याने सादरसंगीत साहित्य पोस्ट कार्यालयात आणून जावयाचा हट्टपूर्ण केला.
सातारा शहर पोस्ट कार्यालयात हरिश शानबा जाधव हे टपाल बटवऱ्याचे काम करत आहेत. त्यांच कार्यालयात असंख्य कर्मचारी काम करतात. प्रत्येकाची कामाची वेळ ठरलेली आहे, त्यामुळे अनेकदा बोलायलाही वेळ मिळत नाही. पण त्याच विभागात काम करत असलेले अजित चव्हाण यांच्याशी छान गट्टी जमली. दोघेही खटाव तालुक्यातील वरुड येथील रहिवाशी. हरिश जाधव यांच्या वाड्यातीलच मुलगी अजित चव्हाण यांना दिलेली, त्यामुळे ते नेहमी हरिश जाधव यांना मामा म्हणूनच आवाज देत. पुढेपुढे साऱ्या कर्मचाऱ्यांचेच ते मामा बनले.
अधिक महिना सुरू आहे. या महिन्यात दानधर्म करण्याला महत्त्व आहे. हाच धागा पकडून चिडवण्याच्या हेतूने सर्वजण हरिश जाधव यांना चिडवत होते. ‘काय मामा, अधिक महिना सुरू आहे. लोक जावयाचे लाड करतात. जावयाचे लाड केल्यावर कमी होत नाही. बाकीचं सोडा पण किमान अनारसे तरी खाऊ घाला.’
हरिश जाधव हे देखील शांत रहात, अन् सोमवार, दि. १३ रोजी सकाळी हरिश मामा चक्क मामी सुनीता यांना घेऊन सीटी पोस्ट कार्यालयात अवतरले. येताना त्यांनी ताट भरुन अनारसे, साडी-चोळी, टॉवेल-टोपी, पोशाख आणला. सर्व कर्मचाऱ्यांना बोलावून त्यांनी सर्वांदेखत जावई अजित चव्हाण यांचा मानसन्मान केला.
या छोटेखानी कार्यक्रमाला महेंद्र दयाळ, पोस्टमन कर्मचारी संघटनेचे वसंत कुंभार, उमेश मोहिते, राजेंद्र कीर्तने, योगेश महाडीक, सुनील क्षीरसागर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Dosaidan to the businessman in the post office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.