वाई तालुक्यातील वणव्याचे तांडव थांबता थांबेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:41 IST2021-03-09T04:41:41+5:302021-03-09T04:41:41+5:30
वाई : कोरोनाचा मुकाबला करण्यात मग्न असतानाच वाई तालुक्यातील काही समाज कंटक वणवा लावण्यात मग्न आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ...

वाई तालुक्यातील वणव्याचे तांडव थांबता थांबेना!
वाई : कोरोनाचा मुकाबला करण्यात मग्न असतानाच वाई तालुक्यातील काही समाज कंटक वणवा लावण्यात मग्न आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वनसंपदा जळून खाक होत आहे. पर्यावरण प्रेमींसह प्रशासन वणवा विझविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यासाठी मोठी जोखीम उचलून धाडस दाखवत आहेत.
सातारा, जावळी, वाई तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून लावले जात असलेल्या वणव्यांचे प्रमाण पाहता समाजकंटकांनी जणू वन विभागाला ‘चॅलेंज’च दिले आहे की, ‘तुम्ही वणवा विझवा, आम्ही तो पुन्हा लावू...!’ त्यावर उपाय म्हणून वणवा रोखण्यासाठी प्रत्येक गावात हेरखाते तयार करून समाज कंटकांना वणवा लावण्यापासून रोखण्याचा प्रयत्न होऊ शकतो. वणव्याचे तांडव थांबविण्याचा प्रयत्न करू शकतो. डोंगर काळेकुट्ट पडले आहेत. वाईच्या पश्चिम भागातील ३५ ते ४० गावांत हे नक्की करु शकतो. वणवा विरोधी मुलांचा मोठा ग्रुप तयार आहे. वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली हा प्रयोग राबविण्यात यावा. अभेपुरी, गाढवेवाडी तसेच पश्चिम भागात डोंगर काही ठिकाणी वणव्यामुळे काळेकुट्ट झाले आहेत. रविवारी रात्री मांढरदेव, बालेघरच्या पूर्वेकडील डोंगरास वणवा लागल्यामुळे हजारो हेक्टर डोंगर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. यामुळे मोठे नुकसान झाले. सरपटणारे अनेक जीव वणव्यात मृत्यूमुखी पडले. परंतु पर्यावरणाच्या जीवावर उठलेल्या समाज कंटकांना त्याचे काही देणेघेणे नाही.
संपूर्ण देश महासंकटात असताना वणवा लावण्यापासून रोखणे हे एक मोठे संकट सध्या वाई तालुक्यात वन विभागापुढे आहे. वणवामुक्त डोंगर ठेवण्यासाठी गावोगावी दक्षता कमिट्या तयार केल्या पाहिजेत. त्यासाठी वन विभागाबरोबर नागरिकांसह समाजातील सामाजिक संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे.
चौकट
वणवा लागणारी केंद्र
वाईचा पसरणी घाट तेरा किलोमीटरचा, सोनजाई डोंगर, वाईच्या पश्चिम भागातील घेरा केंजळ, वासोळे, जांभळी, संपूर्ण रिंग रोड, पाचगणी टेबल लँड, थापा या ठिकाणी मुखत्वे नेहमीच वणवा लावण्यात येतो. समाजकंटक हे दारूच्या नशेत जाणीवपूर्वक त्रास देण्याच्या उद्देशाने, गैरसमजातून वणवा लावतात. प्रबोधनाबरोबर कडक शासन व गुप्तचर संघटना यावर जालीम उपाय आहे. पर्यावरणप्रेमींचा हा आग्रह वन विभाग नक्कीच अंमलात आणणार आहे. वणवा लावणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाणार असून, कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती वनक्षेत्रपाल महेश झांजुर्णे यांनी दिली.
०८वाई-वणवा
वाई तालुक्यातील अनेक डाेंगरांमध्ये समाजकंटकांकडून वणवा लावला जात आहे.