नका पेटवू वणवा; जळतेय वनसंपदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:39 IST2021-04-07T04:39:28+5:302021-04-07T04:39:28+5:30

कोळकी : फलटण तालुक्यातील दुधेबावी परिसरातील प्रसिद्ध भवानी आईच्या डोंगराला वणवा लावण्याचा प्रकार घडला असून, दोन दिवस या वणव्याची ...

Don't light a fire; Burning forest | नका पेटवू वणवा; जळतेय वनसंपदा

नका पेटवू वणवा; जळतेय वनसंपदा

कोळकी : फलटण तालुक्यातील दुधेबावी परिसरातील प्रसिद्ध भवानी आईच्या डोंगराला वणवा लावण्याचा प्रकार घडला असून, दोन दिवस या वणव्याची आग या डोंगरावर भडकली आहे. त्यामुळे ‘नका पेटवू वणवा; जळतेय वनसंपदा’ असे आवाहन या परिसरातील नागरिकांकडून होत आहे. वनविभागानेही जनजागृती करावी, अशी मागणी होत आहे.

जिल्ह्यात ठिकठिकाणी वणवा लागण्याचे प्रकार घडत असताना, हे लोण आता फलटण तालुक्यातही येऊन पोहोचले आहे. दुधेबावी परिसरातील भवानी आईच्या डोंगराला गेले दोन दिवस वणवा लागलेला आहे. भवानी डोंगरावर लागलेल्या वणव्याच्या आगीत गवत व वनविभागाने लावलेली अनेक झाडे जाळून खाक झाली आहेत, तर अनेक मोठ्या झाडांनाही झळा बसल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात गवत जळाल्याने परिसरातील येथे चरायला नेत असलेल्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे, तसेच आगीत अनेक वनौषधी, सरपटणारे प्राणी, कीटक, तृणभक्षी, अंडी, घरटी जळून खाक होत असल्याने, येथील वनसंपदाही नष्ट होत आहे.

त्यामुळे परिसरात वणव्याचा प्रकार लक्षात आला, तर तातडीने तो विझविण्यासाठी प्रयत्न करावेत व वनविभागाशी संपर्क साधावा. जर कुणी वणवा लावण्याचा प्रयत्न करीत असेल, तर अशा प्रवृत्तींना अटकाव करणे आवश्यक आहे.

हे करू नये -

१. डोंगरकपारीमध्ये स्वयंपाकासाठी अथवा शेकोटीसाठी विस्तव पेटवून तसाच जळत ठेवू नये. तसे करण्यापासून दुसऱ्यास परावृत्त करावे.

२. डोंगरकपारीमध्ये बिडी, सिगारेट ओढून त्याची थोटके इतरत्र फेकू नयेत.

३. डोंगरकपारीतील अथवा वनालगतच्या शेतातील झाडाखालील पालापाचोळा जाळू नये.

४. रात्री डोंगरकपारीतून जाताना हातात टेंभा, पलिता, धुंदरी घेऊन जाऊ नये. त्याऐवजी बॅटरी घेऊन जावे.

५. डोंगरकपारीलगतच्या शेताच्या बांधावरील काडी-कचरा निष्काळजीपणे जाळू नये.

आगीचा परिणाम असा होतो -

१. गवत, पालापाचोळा जळून राख झाल्याने जमिनीतील सेंद्रिय घटक नष्ट होतात.

२. वनस्पती पुनर्निर्मितीला बाधा येते.

३. चारा मिळेनासा होऊन जनावरे त्यासाठी भटकतात.

४. ती अशक्‍त बनतात. दुभती जनावरे भाकड होतात.

५. पडलेली व वाळलेली झाडेझुडपे जळतात.

६. वारंवार लागणाऱ्या आगींमुळे उघड्या पडलेल्या जमिनीवर पावसाचे पाणी थेट वेगाने पडते.

७. जमिनीचा सुपीक मातीचा थर पाण्याच्या प्रवाहात वाहून जातो.

८. जमिनीची धूप होऊन पाणी धारण करण्याची क्षमता नष्ट होते.

९. भूगर्भातील पाण्याची पातळी खालावते. विहिरी, तळी वेळेपूर्वीच आटू लागतात.

१०. कीडभक्षी, पक्ष्यांची घरटी, अंडी, पिले जळून खाक होतात.

११. विविध फळझाडे, बहुगुणी वनौषधी जळून खाक होतात.

कोट-

आम्ही शासकीय वनक्षेत्रात नियमानुसार जाळरेषा काढलेल्या असतात. मात्र, काही लोक त्या शेजारील असलेल्या शेतात पाचट वैगरे पेटवत असतात. त्यामुळे डोंगरांना आग लागण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. डोंगराजवळील शेतकऱ्यांनी शेतातील केरकचरा पेटवत असताना दुसरीकडे आग पसरणार नाही, याची दक्षता घ्यावी. आग लावणारे सापडल्यास त्यांच्यावर नियमानुसार कडक कारवाई करण्यात येईल.

- मारुती निकम, परिक्षेत्र वनअधिकारी, फलटण

06कोळकी

दुधेबावी, ता.फलटण येथे भवानी आईच्या डोंगरावर वणवा लागला होता. (छाया: सतीश कर्वे)

Web Title: Don't light a fire; Burning forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.