घरी नका येऊ... बघा, शक्य असेल तर मुक्काम वाढवा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:39 IST2021-04-20T04:39:30+5:302021-04-20T04:39:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : कोविड रुग्णांमध्ये रोज हजारांची भर पडत असल्याने जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेवर त्याचा भलताच ताण आहे. ...

घरी नका येऊ... बघा, शक्य असेल तर मुक्काम वाढवा!
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोविड रुग्णांमध्ये रोज हजारांची भर पडत असल्याने जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेवर त्याचा भलताच ताण आहे. उपलब्ध संसाधनांमध्येही अधिकाधिक रुग्णांवर उपचार करून त्यांना बरे करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्र प्रयत्नशील आहे. मात्र, बरे झालेल्या रुग्णांना न्यायला यायला नातेवाइकांनी पाठ दाखविल्याने अत्यवस्थ रुग्णांचे जीव धोक्यात येऊ लागले आहेत. रुग्णवाहिकेत रुग्ण वेटिंगवर असताना सरकारी रुग्णालयात बरे झालेल्या रुग्णांना घरी घेऊन जाण्यासाठी विनंती करावी लागत आहे.
मुंबई आणि पुण्याप्रमाणेच साताऱ्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. वाढत जाणाऱ्या रुग्णांना सुविधा पुरविण्यासाठी आरोग्य यंत्रणेवर मर्यादा येत आहेत. वर्षभर सलग कामाचा ताण जाणवणाऱ्या आरोग्य क्षेत्रावर आता नातेवाइकांच्या या भूमिकेमुळे हतबल व्हायची वेळ आली आहे. कोणाची काहीही अडचण असली तरीही जागतिक महामारीच्या या काळात सर्वांनीच सहकार्य करणे अपेक्षित आहे. घरी रुग्णाला ठेवायची सोय नाही, घर लहान आहे, त्यांची काळजी घ्यायला कोणी नाही, अशी कारणं सांगून खरोखर गरज असणाऱ्या रुग्णांना वैद्यकीय सेवा न मिळू देणे ही या व्यवस्थेशी केलेली प्रतारणा आहे.
शासकीय रुग्णालयांत मोफत सोय असल्याने केवळ तिथंच रुग्णांना ठेवण्याचा आग्रह नातेवाईक करीत आहेत. याउलट खाजगीत वाढत्या बिलाच्या भीतीने अगदी चार दिवसांतही रुग्णाला सोडा म्हणणारे नातेवाईक आहेत. घेता घेता देणाऱ्याचे हात काढून घेण्याची वृत्ती वेळीच बदलली नाही तर त्यामुळे अनेकांचे जीव धोक्यात येऊ शकतात.
सुनेचं बाळंतपण तर कधी घर लहान असल्याचं दिलं जातंय कारण
साताऱ्यातील जम्बो कोविड सेंटर किंवा जिल्हा शासकीय रुग्णालयात गेल्या काही दिवसांत बेडच शिल्लक नाहीत, अशी अवस्था आहे. अशातच रुग्णालयातील उपचार संपवून ज्यांना घरी जाणं शक्य आहे, त्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांकडून रुग्णांना रुग्णालयात ठेवण्याचा आग्रह करण्यात येत आहे. कोणाकडे विलगीकरणाची सोय नाही तर कोणाला कुटुंबात हा संसर्ग होईल याची भीती वाटते. कोणाला गर्भवती लेकी-सुनांच्या जिवाला घोर नको म्हणून रुग्णालयातच राहायचं असल्याचं कारण दिलं जात आहे.
हा अट्टाहास अनेकांच्या जिवावर
गेल्या आठ दिवसांत जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येचा विस्फोट झाला आहे. शासकीय रुग्णालयांसह खाजगी रुग्णालयांच्या आवारात रुग्णवाहिकेत रुग्ण वेटिंगवर असल्याचं सर्रास पाहायला मिळतंय. ऑक्सिजन बेड न मिळाल्याने मृत्यू होण्याचे प्रकारही घडलेत. जम्बो सेंटरमध्ये तर अत्यावस्थ रुग्ण आल्यानंतर दाखल झालेल्यांपैकी ज्यांना बरे वाटतेय त्यांना डिस्चार्ज दिला जातोय. पण, उपचार पूर्ण झाल्यानंतरही काही रुग्णांना न्यायला त्यांचे नातेवार्ईक येत नसल्याने प्रशासनापुढे वेगळेच संकट उभे राहिले आहे. रुग्ण आणि नातेवाइकांच्या या अट्टाहासामुळे गरजू रुग्णांना प्राणास मुकावे लागण्याची शक्यता आहे.
कोट :
दवाखान्याबाहेर रुग्णवाहिकेत रुग्ण वेटिंगला असल्याने ज्यांना रुग्णालयात उपचारांची गरज नाही, त्यांना घरी सोडण्याचा निर्णय आम्ही घेतोय. बाहेरची परिस्थिती सर्वांना ज्ञात आहे, अशावेळी रुग्णांना रुग्णालयात न्यायला न येणे, आमची अडचण आहे, आज नाही यायला जमायचं अशी कारणे दिली जातात. बरे झालेल्या रुग्णांमुळे बेड अडकून राहतो यावर आम्ही नातेवाइकांना समजावून सांगून मार्ग काढायचा प्रयत्न करतोय.
- डॉ. भाऊसाहेब पवार, जम्बो कोविड हॉस्पिटल, सातारा