कऱ्हाड येथे वडार समाजाचा गाढव मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:46 IST2021-09-04T04:46:33+5:302021-09-04T04:46:33+5:30
कऱ्हाड : वडार समाजाचा पिढीजात व्यवसाय असलेल्या दगडखाणी मंजुरीबाबत सातारा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांकडून वारंवार दिरंगाई केली जात आहे. कागदपत्रं अपूर्ण ...

कऱ्हाड येथे वडार समाजाचा गाढव मोर्चा
कऱ्हाड : वडार समाजाचा पिढीजात व्यवसाय असलेल्या दगडखाणी मंजुरीबाबत सातारा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांकडून वारंवार दिरंगाई केली जात आहे. कागदपत्रं अपूर्ण असल्याचे कारण समोर करून वडार समाजाला वेठीस धरले जात असल्याचा आरोप करून वडार समाजाच्यावतीने कऱ्हाड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी सातारा जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे शरद गाडे यांनी उपस्थित राहून या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला.
वडार समाजाच्यावतीने कऱ्हाड तालुक्यातील पाडळी, केसे, नांदलापूर याठिकाणी दगडखाण मंजुरीसाठी संघटनेच्या तसेच वडार समाजाच्या काही कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला आहे. या पत्रव्यवहाराच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयातून कऱ्हाड उपविभागीय अधिकारी कार्यालयात संबंधित पत्राच्या अनुषंगाने अहवाल मागणी केली जात आहे. या अहवालामध्ये त्रुटी दाखवून विनाकारण वडार समाजाला वेठीस धरण्याचा उद्योग प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असल्याचा आरोप वडार समाजाकडून केला जात आहे. या अनुषंगाने आज कऱ्हाड येथील प्रशासकीय इमारतीसमोर वडार समाजाच्यावतीने गाढव मोर्चा आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला सातारा जिल्हा वंचित बहुजन आघाडीकडून पाठिंबा देण्यात आला.
यावेळी शरद गाडे म्हणाले, ‘वंचित समाजातील घटकांना न्याय देण्याचे काम राज्य शासनाने करावे आणि राज्य शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करून संबंधित अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वडार समाजाला न्याय द्यावा. अन्यथा यापुढे होणाऱ्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आक्रमकपणे पाठिंबा दिला जाईल.’
फोटो
कऱ्हाड येथे वडार समाजाच्यावतीने गाढव घेऊन मोर्चा काढण्यात आला.