कणूरच्या शेतकऱ्यांकडून ४ गुंठे जागा आरोग्य उपकेंद्रासाठी दान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:38 IST2021-04-06T04:38:12+5:302021-04-06T04:38:12+5:30

वाई : कणूर (ता. वाई) येथील गंगाधर नाना चव्हाण या दानशूर व्यक्तीने परिसरातील सुमारे ३ हजार लोकांच्या ...

Donation of 4 guntas of land from Kanur farmers for health sub-center | कणूरच्या शेतकऱ्यांकडून ४ गुंठे जागा आरोग्य उपकेंद्रासाठी दान

कणूरच्या शेतकऱ्यांकडून ४ गुंठे जागा आरोग्य उपकेंद्रासाठी दान

वाई : कणूर (ता. वाई) येथील गंगाधर नाना चव्हाण या दानशूर व्यक्तीने परिसरातील सुमारे ३ हजार लोकांच्या आरोग्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ४ गुंठे जागा आरोग्य उपकेंद्रासाठी दान केली. या जागेमुळे कणूर, नागेवाडी दरेवाडी येथील ग्रामस्थांचा आरोग्याचा प्रश्न सुटणार आहे.

आ. मकरंद पाटील यांनी कणूर आणि परिसरातील वाड्या-वस्तीवर राहणाऱ्या ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न सुटावा, यासाठी प्राथमिक उपकेंद्र मंजूर केले. मात्र कणूर गावात यासाठी प्रयत्न करूनही जागा उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे उपकेंद्र प्रलंबित राहिले होते. याबाबत गंगाधर चव्हाण यांच्याकडे गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी जागेची मागणी केली. मुख्य रस्त्यावर असणारी मोक्याची जागा चव्हाण देतील का? स्वतःच्या भावाला फूटभर तर सोडाच; पण इंचभरही जागा न सोडण्याची मानसिकता वाढत चाललेली असताना, असा प्रश्न चव्हाण यांच्याशी चर्चा करताना सर्वांच्या मनात होता. पण चव्हाण यांनी क्षणाचाही विलंब न लावता उपकेंद्रासाठी ४ गुंठे जागा गावाला दिली.

विशेष म्हणजे, चव्हाण यांच्या पत्नी लतिका, मुलगा चेतन यांनी देखील गंगाधर चव्हाण यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला. आ. मकरंद पाटील यांनी या जागेतील तांत्रिक त्रुटी दूर केल्याने या कणूरमध्ये प्राथमिक उपकेंद्र होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कणूर, दरेवाडी नागेवाडी ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न सोडविल्याबद्दल चव्हाण यांचा कणूरचे सरपंच निखिल राजपुरे, उपसरपंच सुरेखा जाधव, हरिदास राजपुरे, हणमंत पवार, बाळू पाटील, सुनील राजपुरे, विलास राजपुरे, भानुदास राजपुरे, सुधाकर राजपुरे, प्रवीण मतकर, संदीप राजपुरे, हणमंत राजपुरे सोसायटीचे चेअरमन गणेश राजपुरे, ग्रामसेवक उमेश जाधव, संदीप चव्हाण आदींनी ग्रामपंचायतीच्यावतीने कार्यालयात शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान केला.

चौकट :

या उपकेंद्रामुळे आपल्याच भागातील गरजू रुग्णांवर उपचार होणार आहेत. त्यांच्या वेदना दूर करण्यासाठी, रुग्णसेवा करण्यासाठी माझी जागा वापरली जातेय, यापेक्षा या जागेचा आणखी काय सदुपयोग असणार? आयुष्यात आपल्या माणसांसाठी काही तरी करता आल्याचे समाधान या ४ गुंठे जमिनीच्या दानातून मिळाले.

- गंगाधर चव्हाण, जागामालक

Web Title: Donation of 4 guntas of land from Kanur farmers for health sub-center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.