डोळेगाव-पाडळी रस्त्याची चाळण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:11 IST2021-02-05T09:11:19+5:302021-02-05T09:11:19+5:30
शेंद्रे : सातारा तालुक्यातील डोळेगाव-पाडळी रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. खडी पूर्णपणे उखडल्याने रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या ...

डोळेगाव-पाडळी रस्त्याची चाळण...
शेंद्रे : सातारा तालुक्यातील डोळेगाव-पाडळी रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. खडी पूर्णपणे उखडल्याने रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरू झाली असून, बांधकाम विभागाने डांबरीकरणाचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणी परिसरातील वाहनधारकांतून होत आहे.
गेल्या एक वर्षापासून या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर खड्डे चुकविताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वाहनधारकांना वाहन चालविताना रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हेच समजत नाही. प्रामुख्याने डोळेगाव ते पाडळी या परिसरात रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या परिसरात रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले असून, रस्त्याची खडी पूर्णपणे निसटलेली आहे. काही ठिकाणी तर रस्त्यावर एकेक फुटाचे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या परिसरात अपघातांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मांडवे, निनाम, पाडळी, डोळेगाव, भैरवगड या परिसरातील ग्रामस्थ व शेतकऱ्यांची या मार्गावरून नेहमी ये-जा सुरू असते. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे शेतकरी वर्गाला शेती मालाची ने- आण करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने याची गंभीर दखल घेऊन तत्काळ या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ व शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.