डॉल्बी दणाणली... आम्ही नाही पाहिली!
By Admin | Updated: September 13, 2014 00:01 IST2014-09-12T23:59:47+5:302014-09-13T00:01:33+5:30
जिल्ह्यात दहाच यंत्रे : दोन वर्षांत एकही गुन्हा नाही; तीन पोलीस ठाण्यांमागे एक यंत्र

डॉल्बी दणाणली... आम्ही नाही पाहिली!
नितीन काळेल / सातारा
ध्वनिप्रदूषण होऊ नये यासाठी डॉल्बीचा आवाज किती डेसिबलपर्यंत आहे याच्या मापनासाठी असणारे नियम सरसकट पाळले जात नसल्याचे दिसून येऊ लागले आहे. त्यातच अलीकडील दोन वर्षांत जिल्ह्यात ध्वनीची मर्यादा ओलांडल्याने एकाही डॉल्बीधारकांवर गुन्हा नोंद झाला नाही. त्यातच जिल्ह्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत अनेक डॉल्बी दणाणत असतात; पण त्याच्या मापनासाठी पोलिसांकडे ध्वनिमापन यंत्रणा कमी आहे. जिल्ह्यात फक्त १० यंत्रे उपलब्ध आहेत, त्यामुळे कुठे-कुठे जायचे असा प्रश्न पोलिसांना पडत आहे.
साताऱ्यात राजपथावरील एक जीर्ण इमारत कोसळली. ही घटना गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी घडली. त्यामुळे डॉल्बीच्या दणदणाटामुळे ही इमारत कोसळली असा एक मतप्रवाह आहे. त्यामुळे डॉल्बीधारकांवर कारवाईची मागणी पुढे येऊ लागली आहे. सातारा शहर पोलिसांनी अशा २५ जणांवरील कारवाईचे प्रस्ताव तयार करुन पोलीस अधीक्षकांडे पाठविले आहेत. यामुळे संबंधितांवर काय कारवाई होणार आहे, हे पुढेच ठरणार आहे. एकंदरीत ध्वनिप्रदूषणाच्या कारवाईबद्दल काही नियम आहेत, ते पाळले जात नसल्याचे समोर आले आहे.
ध्वनीची मर्यादा कितीपर्यंत असावी ती दिवसा किती व रात्री कितीपर्यंत असावी असा एक नियम आहे. त्यानुसार औद्योगिक क्षेत्रात ७५-७० डेसिबल, वाणिज्य ६५-५५, निवासी ५५-४५ आणि शांतता क्षेत्रात ५०-४० असावी असा एक नियम आहे. पण, साताऱ्यात गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी ही मर्यादा मोठ्या प्रमाणात डावलण्यात आली हे विशेष आहे. कारण साताऱ्यात सुरू असणाऱ्या डॉल्बीचा दणदणाट ११८ डेसिबलपर्यंत गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे २५ जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.
जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड, वाई, फलटण, पाटण अशा मोठ्या शहरांत विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीचा दणदणाट असतो. पण त्यासाठी ध्वनिमापन यंत्रणा पोलिसांकडे अपुरी आहे. जिल्ह्यातील पोलिसांसाठी फक्त दहाच यंत्रे उपलब्ध आहेत. म्हणजे विचार करायला गेले तर ३ पोलीस ठाण्यांमागे एक यंत्र अशीच स्थिती आहे.
सातारा शहर पोलीस ठाण्याकडेही एकच यंत्र आहे. त्यावर संपूर्ण सातारा शहरातील डॉल्बीचे मापन होते. म्हणजेच एक यंत्र शहरात कोठे-कोठे घेऊन जायाचे असा प्रश्न पोलिसांसमोर होता. त्यामुळेच गणेश विसर्जन मिरवणुकीत अनेक डॉल्बीधारकांवरही कारवाई होऊ शकली नाही, हे वास्तवही नुकतेच समोर आले आहे.