दोन मंडळांची डॉल्बीमुक्ती शपथ
By Admin | Updated: August 30, 2015 00:13 IST2015-08-30T00:12:15+5:302015-08-30T00:13:06+5:30
प्रदुषणाला रामराम : म्हसवड येथील शांतता कमिटीच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दोन मंडळांची डॉल्बीमुक्ती शपथ
म्हसवड : ‘डॉल्बी’च्या दुष्परिणामांबाबत ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानंतर जिल्ह्यातील अनेक गावांनी डॉल्बी हद्दपार केली. अनेक गणेश मंडळांनी डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार केला. तर अनेक मंडळे व गावे डॉल्बीमुक्तीच्या वाटेवर आहेत. म्हसवड, ता. माण येथे प्रशासन व गणेशोत्सव मंडळांच्या आयोजित बैठकीतही ‘वैभव व गोल्डन’ या दोन गणेश मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव ‘डॉल्बीमुक्त’ साजरा करणार असल्याचे स्पष्ट केले.
म्हसवड येथे शनिवारी म्हसवड नगरपरिषद, पोलीस ठाणे व महसूल विभागाच्या संयुक्त विद्यमाने पालिका सभागृहात गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीस प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, तहसीलदार सुरेखा माने, नगराध्यक्ष विजय धट, उपनगराध्यक्ष विजय मासाळ, प्रभारी मुख्याधिकारी विद्या पोळ, सहायक पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्यासह गणेश मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रांताधिकारी मुल्ला म्हणाले, ‘गणेश मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपलं गाव आदर्श बनविण्यासाठी पुढाकार घेऊन विधायक उपक्रम राबवून वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, माणगंगा पुनर्जीवन करण्यासाठी माण नदीची स्वच्छता, वडजाई ओढा रुंदीकरण व सरळीकरण करण्यासाठी श्रमदानासाठी पुढे यावे, तुमच्याबरोबर प्रशासनही आहे,’ अशी ग्वाही दिली.
तहसीलदार सुरेखा माने म्हणाल्या, ‘म्हसवड पालिकेने महिला सक्षमीकरणासाठी राबविलेली योजना कौतुकास्पद असून, ती इतरांना प्रेरणा देणारी आहे. तालुक्यातील जलयुक्त शिवार योजनेत जी गावे सहभागी झाली आहेत ती गावे पाण्याने श्रीमंत झाली आहेत. ती गावे टँकरमुक्त झाली आहेत. जलसंधारणाच्या कामाला निधीची कमतरता नाही. देणारे हात हजारो आहेत. फक्त श्रमदानासाठी तरुणांनी पुढे यावे.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण म्हणाले, ‘गणेशोत्सव मंडळांनी धर्मादाय कार्यालयाचा परवाना घ्यावा, मंडळांनी आवाजाची मर्यादा कायद्याप्रमाणे पालन करावे. डॉल्बीला पोलीस प्रशासन परवानगी देणार नाही. जास्त डेसीबल पेक्षा आवाज मोठा असणाऱ्या मंडळावर कायदेशीर कारवाई केली जाईल. (प्रतिनिधी)