‘डॉल्बी’ने चिमुकल्यांचा जीव घाबरा
By Admin | Updated: September 16, 2014 23:45 IST2014-09-16T22:27:35+5:302014-09-16T23:45:20+5:30
आरोग्यावर दुष्परिणाम : उत्सवात मुलांवर चांगले संस्कार घडावेत; पालकांची अपेक्षा

‘डॉल्बी’ने चिमुकल्यांचा जीव घाबरा
प्रदीप यादव- सातारा -गणेशोत्सवात थरावर थर रचून मोठ्या आवाजात डॉल्बी वाजत असताना माझ्या चिमुकलीच्या काळजाचं ठोकं वाढलं होतं. डोळे विस्फारून ती भेदरलेल्या अवस्थेत इकडे-तिकडे बघत होती. घरातल्या कुणाकडेच ती जात नव्हती. पाळण्यात झोपवली तरी सारखी रडायची. आम्ही सगळे तिला खेळविण्याचा प्रयत्न करत होतो; पण आपल्या माणसांनाही ती ओळखत नव्हती. डाल्बीच्या दणक्याने चिमुकलीचा जीव घाबराघुबरा झाला होता. हे शब्द आहेत एका आईचे.
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या वेळी शाहू चौकात वाजणाऱ्या डॉल्बीच्या दणक्याने खिडकीच्या काचा थरथरत होत्या आणि भिंतींना हादरे बसत होते. कुंभारवाड्यातील रोहिणी कुंभार सांगत होत्या. डॉल्बी वाजवून आनंदोत्सव साजरा करताना सामाजिक भानही ठेवायला हवं. ज्या रस्त्यावरून मिरवणुका जातात, त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असणाऱ्या घरांमध्ये लहान मुले असतात. वृद्ध माणसे असतात. याचा विचार कोणीच करत नाही. एखाद्या सशक्त माणसाच्या हृदयाचे ठोके वाढविणाऱ्या डॉल्बीच्या दणक्याने लहान मुलांचे काय हाल होतात, हे मी जवळून अनुभवले आहे.
केवळ दिखाव्यापायी उत्सवांमधील पावित्र्य आता संपले आहे. बाप्पांचा उत्सव आता फक्त पोरांचा उत्सव बनला आहे. बेभान होऊन नाचणे म्हणजे मिरवणूक, असा समज तरुणाईचा होत चालला आहे, हे घातक आहे. डॉल्बी लावायचीच असेल तर स्पीकरची संख्या कमी हवी आणि आवाजही कमी ठेवायला हवा. स्वत:च्या आनंदासाठी इतरांना होणाऱ्या त्रासाचीही जाणीव असायला हवी, अशी अपेक्षा एक आई म्हणून रोहिणी कुंभार यांनी व्यक्त केली.
संगीत मनाला आनंद देणारं असावं...
सण-उत्सवांमधला खरा बाज हरवत चालला आहे. डॉल्बीमुळं वाईट विचारांना चालना मिळत आहे. मुलं दारू पिवून धिंगाणा घालतात. भांडणाचे प्रकार घडतात. यामुळे युवकांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते. कलेचे प्रदर्शन करायलाच हवे; पण त्या कलेला उत्स्फूर्त दाद मिळाली पाहिजे. ते त्रासदायक ठरू नये. उत्सवांमध्ये नाचगाणे असावे; पण ते सर्वांच्याच मनाला आनंद देणारे असावे. पारंपरिक कलांचे सादरीकरण उत्सवांमध्ये झाले तर लहान मुलांच्या मनात त्या कला आपोआपच रुजतील. यानिमित्ताने लुप्त होण्याच्या मार्गावर असणाऱ्या आपल्या लोककलांचे संवर्धन होईल. शिवाय असे कलाप्रकार हे अबालवृद्धांना आनंद देणारे असल्यामुळे तेही उत्सवात आनंदाने सहभागी होऊ शकतील, अशी अपेक्षा विद्या शरद देगावकर यांनी व्यक्त केली.