जिल्ह्यात चार वर्षांत कुत्र्यांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:10 IST2021-02-05T09:10:06+5:302021-02-05T09:10:06+5:30

नितीन काळेल लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा शहराजवळील दोघांचा श्वानाने चावा घेतल्याने मृत्यू झाला. यामुळे भटक्या कुत्र्यांचा विषय ...

Dogs in the district in four years | जिल्ह्यात चार वर्षांत कुत्र्यांचा

जिल्ह्यात चार वर्षांत कुत्र्यांचा

नितीन काळेल

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : सातारा शहराजवळील दोघांचा श्वानाने चावा घेतल्याने मृत्यू झाला. यामुळे भटक्या कुत्र्यांचा विषय ऐरणीवर आला असून मागील चार वर्षांत जिल्ह्यातील तब्बल ८९ हजारांवर नागरिकांना चावा घेतलाय. ही बाब गंभीर असल्याने कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मागणी होऊ लागली आहे, तर जिल्ह्यात ६० हजारांवर मोकाट आणि पाळीव श्वान आहेत.

घराच्या संरक्षणासाठी कुत्री पाळण्यात येतात. मोठे बंगले, घरात असणाऱ्या कुत्र्यांची काळजी घेण्यात येते. त्यासाठी आवश्यक लसीकरण करण्यात येते. पण, मोकाट कुत्र्यांबाबत असे होत नाही. तसेच त्यांच्या वाढीवरही नियंत्रण राहत नाही. जिल्ह्यातील मागील पशुगणनेनुसार ६४ हजारांवर पाळीव आणि भटक्या श्वानांची नोंद झालेली आहे. यामधील अर्ध्याहून अधिक कुत्री ही भटकी समजली जात आहेत. या कुत्र्यांकडूनच अधिक करून नागरिक आणि जनावरांवर हल्ले होत आहेत. यामुळे नागरिकांना जीव गमवावा लागल्याच्या घटनाही पुढे येत आहेत.

जिल्ह्यात २०१७ या वर्षात १६ हजार १३१ नागरिकांना श्वानाने चावा घेतला, तर २०१८ या वर्षात २१ हजार ६८ नागरिकांवर हल्ला केल्याची नोंद झाली आहे. असे असले तरी २०१९ आणि २०२० या दोन वर्षांत कुत्र्यांच्या हल्ल्याचे प्रमाण वाढलेले आहे. कारण, २०१९ मध्ये तब्बल २६ हजार ३९२ तर २०२० या वर्षात २६ हजार २५७ जणांना चावा घेतला आहे. तर २०२१ मध्ये आतापर्यंत ९६० जणांना कुत्र्याने चावा घेतल्याची नोंद झालेली आहे. त्यामुळे कुत्रा चावल्याची ही आकडेवारी गंभीर सल्रूपाचीच आहे. यामध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याचाही समावेश आहे. त्यातच पिसाळलेले कुत्रे चावल्यानंतर वेळेत औषधोपचार घेतले नाहीत तर जीवाला काही जणांना मुकावेही लागलेले आहे.

सातारा शहराजवळील जकातवाडी आणि डबेवाडी येथील दोघांचा भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने मृत्यू झाला. त्यामुळे विशेषकरून भटक्या कुत्र्यांचा विषय ऐरणीवर आला आहे. त्यातूनच कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाचा विषय पुढे आला आहे. भटक्या कुत्र्यांचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी त्यांच्या वाढत्या संख्येवर निर्बंध आणणे गरजेचे आहे, असेच मत आता लोकांतून उमटू लागले आहे. यावर प्रशासन काय भूमिका घेणार याकडे लोकांचे लक्ष लागले आहे. योग्य भूमिका घेतली तर अनेकांचे प्राणही वाचणार आहेत. तर जनावरांना घेतलेल्या चाव्याचा आणि मृत्यूचा विषय आणखी वेगळाच आहे.

चौकट :

भटकी कुत्री येथे आढळतात...

भटकी कुत्री आढळण्याची ठिकाणेही वेगवेगळी असतात. अधिककरून मंदिरांच्या परिसरात या कुत्र्यांचा वावर अधिक असतो. खाण्यासाठी मुबलक मिळत असल्याने भटक्या कुत्र्यांचे वास्तव्य मंदिर परिसरातच असते. तसेच कचराकुंडी, लोक खरकटे टाकतात अशा ठिकाणीही भटक्या कुत्र्यांच्या झुंडी दिसतात. अशा परिसरात लोक एकट्याने गेले तर त्यांच्याकडून हल्ल्याचा प्रयत्न होतो.

........................

गावठी उपचार नकोत...

ग्रामीण भागात आजही कुत्रा चावला तर घरगुती व गावठी उपचार घेण्याकडे अनेकांचा कल असतो. पण, असे न करता हा विषय गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कारण, कोणतेही श्वापद चावल्यावर रेबीज होण्याची शक्यता असते. त्यामुळे शासकीय आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. प्रतिबंधात्मक उपचार घ्यावेत. अँटी रेबीज व्हॅक्सिन घ्यावी, असे आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सुचविले.

...............................

कोट :

भटकी कुत्री पकडून जंगलात सोडली तरी ती माघारी येतात. त्यामुळे कुत्र्यांची वाढती संख्या लक्षात घेता त्यांचे निर्बीजीकरण करणे महत्त्वाचे आहे. तरच भटक्या कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण येईल. तसेच कुत्र्याने चावा, हल्ला केल्याच्या घटनाही आपोआप कमी होतील. त्याचबरोबर लोकांनीही कुत्र्याने चावा घेतल्यानंतर आरोग्य केंद्रात जाऊन इंजेक्शन घ्यावे.

- डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी

.........................................................................

Web Title: Dogs in the district in four years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.