माणसाचं शरीर आजारी पडतं, तसं मनही आजारी पडतं व त्यातूनच माणूस अंधश्रद्धेकडे किंवा व्यसनाकडे वळतो. या दोन्ही पातळीवर वडील अंधश्रद्धा निर्मूलन, तर आई व्यसनमुक्ती यासाठी कार्यरत होतेच. तेच काम पुढे नेण्याचा प्रयत्न डॉ. हमीद दाभोलकर यांनी चालू ठेवला आहे.
अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याकडून व आई प्रसिद्ध स्त्री आरोग्य तज्ज्ञ डॉ. शैला दाभोलकर यांच्याकडून समाजकार्याचा वसा आणि वारसा घेऊन पुढे वाटचाल करणारे डॉ. हमीद दाभोलकर हे गेली १४ वर्षे सातारमध्ये मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. ही सेवा नाममात्र शुल्कात अनेकांपर्यंतपर्यंत पोहोचवत आहेत. त्यांची पत्नी डॉ. मुग्धा दाभोलकर यांचीही खंबीर साथ त्यांना असल्यामुळेच त्यांना कामास भरपूर वेळ देणं शक्य होत असते.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या निर्घृण खुनानंतर तर चळवळीतील प्रत्येकाला आपला माणूस गेल्याचे दुःख आहे. हमीद व कुटुंबीय यांना तर हा धक्का खूप मोठा आहे; पण त्यातून स्वतःला सावरत अंधश्रद्धा निर्मूलन समितीची धुरा पेलत आहेत. व्यसनमुक्तीचे कार्य सातारा येथे होते, ते आता पुणे व आसाममधील तेजपूर येथेही चालू करून व्यवस्थित चालवली जात आहेत. व्यसन हा कायमस्वरूपी बरा न होणारा आजार आहे, तरीही त्यामध्ये येणारे यश अधिक कसे मिळेल, यासाठी प्रयत्न चालू असतात.
मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातही शासनाच्या मदतीने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत समुपदेशन सेवा, कोरोना लाटेच्या काळात कोरोना रुग्णांना हेल्पलाईनद्वारे मोफत समुपदेशन करून रुग्णांना मानसिक आधार दिला गेला आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी शिवार ही हेल्पलाईन मोफत चालवली जाते. अलीकडे आत्महत्यांचे प्रमाण वाढत चालले आहे. आत्महत्या रोखण्यासाठी आत्महत्या प्रतिबंधक मनोबल हेल्पलाईन मोफत २४ तासांसाठी चालू आहे. ही सर्व कामे सामाजिक बांधिलकी म्हणून चालू असून, त्याचा लाभ घेणारे अनेकजण समाधानी आहेत. यासोबतच सानेगुरुजी यांनी चालू केलेल्या साधना साप्ताहिकाच्या ट्रस्टचे विश्वस्त म्हणून ते कार्यरत आहेत. मानसिक आरोग्य क्षेत्रातील विविध विषयांवर त्यांनी सादर केलेले शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. समाजाच्या शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य ही अधिक सुदृढ करण्यासाठी त्यांची ही धडपड अशीच पुढे चालू राहणार आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची निर्घृण हत्या झाली होती. हिंसेला केवळ हिंसेने प्रतिवाद करता येतो किंवा प्रश्न सोडविण्यासाठी हिंसेचा आधार घ्यावा लागतो, हा विचार बळकट होत आहे. अशा वातावरणात लोकांचे प्रबोधन आवश्यक आहे. घटनेच्या चौकटीत राहून लढताना यश कमी वेगाने येईल; पण हाच मार्ग योग्य आहे, हा विचार पोहोचविण्याचा प्रयत्न आहे.
- डॉ. हमीद दाभोलकर
चौकट..
महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर यांनी लिहिलेले ‘विवेकाच्या वाटेवर-उन्मादी कालखंडातील लढ्याची गोष्ट’ पुस्तक राजहंस प्रकाशनतर्फे प्रकाशित झाले असून, ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लढ्याचा दस्तावेज ठरले आहे.
- सागर गुजर