ऐकलत का... ‘मी रस्ता बोलतोय’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:44 IST2021-09-06T04:44:07+5:302021-09-06T04:44:07+5:30
शहरातील भेदा चौकापासून काही अंतरावर असणाऱ्या मार्केट यार्ड गेट क्र. १ पासून बैलबाजारकडे रस्ता जातो. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे ...

ऐकलत का... ‘मी रस्ता बोलतोय’!
शहरातील भेदा चौकापासून काही अंतरावर असणाऱ्या मार्केट यार्ड गेट क्र. १ पासून बैलबाजारकडे रस्ता जातो. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागते. गत अनेक वर्षांपासून रस्त्याची ही स्थिती आहे. रस्त्याच्या या दुरवस्थेबाबत परिसरातील नागरिकांनी वारंवार पालिकेकडे तक्रारी केल्या. तसेच रस्त्याच्या दुरुस्तीची मागणीही केली. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यातच काही अज्ञात नागरिकांनी रविवारी शहरातील याच रस्त्यावर वेगवेगळे फलक लावले.
‘मी रस्ता बोलतोय’ या शीर्षकाखाली लावलेल्या या फलकांवर रस्त्याची दुर्दशा, पालिकेची अनास्था, तसेच लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष याबाबत टीकेची झोड उठविण्यात आली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी लावलेले हे फलक पाहून प्रवासीही बुचकळ्यात पडत होते.
दरम्यान, हे फलक लावण्यात आल्यानंतर आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संबंधित लोकप्रतिनिधींच्या समर्थकांनी रस्त्यासाठी निधी मंजूर केल्याची पोस्टही सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. लवकरच या रस्त्याचे काम सुरू होईल, असे आश्वासनही त्याद्वारे देण्यात आले आहे.
- चौकट
फलकांवर काय लिहिलय..?
१) नागरिकांची एकच मागणी... रस्ता व नगरसेवक नवीनच हवा.
२) आमचं ठरलंय... आता तुम्ही ठरवा.
३) इलेक्शन का टाईम आ गया. मेरा नंबर कब आयेगा.
४) आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त मतदान विचार करून करा.
५) रस्त्यासोबत आमच्या शरीराचाही झाला खुळखुळा.
६) किती अपघातांनंतर मला दुरुस्त करणार?
७) अरे... मला कोणी तरी दुरुस्त करा रे!
फोटो : ०५केआरडी०६
कॅप्शन :
कऱ्हाडातील मार्केट यार्ड गेट क्र. १ ते बैलबाजार जाणाऱ्या रस्त्यावर अज्ञात नागरिकांनी असे फलक लावले आहेत.