करू महिलांचा सन्मान : पुरुषांच्या हाती असणारा बदनामीचा ‘रिमोट’ थांबवा
By Admin | Updated: January 1, 2015 00:16 IST2014-12-31T22:12:50+5:302015-01-01T00:16:29+5:30
नवीन वर्षाला सामोरे जात असताना महिलांविषयी आदर बाळगूया आणि त्याविषयी सकारात्मक दृष्टिकोन शिकवूया.

करू महिलांचा सन्मान : पुरुषांच्या हाती असणारा बदनामीचा ‘रिमोट’ थांबवा
मोहन मस्कर-पाटील - सातारा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत महिलांच्या समोर असंख्य समस्या असतानाच त्यांना पुरुषी मानसिकतेचा फटकाही बसू लागला आहे. त्यातच ‘चारित्र्य’ नावाचा ‘रिमोट’ हाती घेऊन पुरुषमंडळी त्यांना बदनाम करत असल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. नवीन वर्षाचे स्वागत करताना आता आपल्याला हे रोखायचे आहे आणि ‘सावित्रीच्या लेकीं’चा आदर करत आता आपणा सर्वांना ‘जोतिबा’ बनून महिलांचा सन्मान करावयाचा आहे. चारित्र्याचा ‘रिमोट’ आता कायमचा फोडून टाकायचा आहे, असे सांगत राजकारण, समाजकारण आदी क्षेत्रांत कार्यरत महिला आणि पुरुषांनी यासाठी ‘जागर’ पुकारला आहे. ‘स्थानिक स्वराज्य संस्थां’त महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळाले आणि अनेकांनी नाके मुरडली. महिलांनी यावरही मात करत ग्रामविकासात क्रांती केली. यानंतर आरक्षण ५० टक्क्यांपर्यंत गेले. परिणामी आरक्षण म्हणजे पुरुषप्रधान संस्कृतीसाठी मोठा धोका असल्याची भीती निर्माण केली गेली आणि त्यातून महिलांना ‘चारित्र्या’च्या मुद्द्यावर अडचणीत आणले जाऊ लागले. अडचणींचा हा प्रवास ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद आणि नगरपंचायत ते महापालिका असा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला आरक्षणानंतर खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण सुरू झाले. एका बाजूला राजकीय, सामाजिक सक्षमीकरण होत असताना दुसरीकडे मात्र नवीन संकट पुढे आले. कार्यरत महिलांच्या ‘चारित्र्या’ची चर्चा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या केली जाऊ लागली. तिची जात, वय, पेहराव, बोलणे यावरून टोमणे मारले जाऊ लागले. मागास समाजातील असेल तर आणखी त्रास होऊ लागला. महिला पदाधिकारी, सरपंच अथवा ग्रामसेवक, तलाठ्याच्या दुचाकीवर बसून गेली अथवा बसमध्ये तिची कोणी तिकीट काढली तरी तिच्या चारित्र्यावर बोट ठेवले जाऊ लागले आहे. जेथे महिला सरपंच होत्या, तेथे दारूबंदी चळवळीने वेग घेतला. महिला मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभागी होऊ लागल्यामुळे अनेक दारू समर्थकांनी महिलांची बदनामी करण्याचाही फंडा वापरला. तरीही महिला मागे हटल्या नाहीत, हे मान्य करावे लागते. चारित्र्य पुरुषाला नसते का, असा सवाल उपस्थित करतच आणि चारित्र्याचा मुद्दा पुढे करून महिलांचे होणारे खच्चीकरण आता आपल्यालाच रोखायचे आहे, असा निर्धार करत साताऱ्यातील काही मंडळी पुढे आली आहे, याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. अशा घटना... असे किस्से... पाच वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक भयानक प्रकार घडला. कऱ्हाड तालुक्यातील नाभिक समाजातील एका महिला सरपंचाने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. ‘तू सरपंच होऊन काय करणार. त्यापेक्षा केसं कापत बस...’ असे म्हणून तिला सारखे चिडवायचे. वाई तालुक्यात मागास समाजातील महिला सरपंचाचा विनयभंगाचा प्रयत्न झाला. जावळी तालुक्यातील नांदगणे येथील महिलांनी दारूबंदीचा निर्णय घेतला, तर व्यसनी मंडळींनी त्यांनाच मिसरी सोडण्याचे आव्हान दिले. अशा किती तरी घटना आहेत की, त्याची यादी संपणार नाही. महिलांशी कसे वागावे, याचे प्रशिक्षण हवे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत महिलांशी कसे वागावे, यासाठी पुरुष मंडळींना विशेष प्रशिक्षण देण्याची आवश्यकता असल्याचे म्हणणे जिल्ह्यातील अनेक आजी-माजी महिला सरपंचांनी व्यक्त केले आहे. ‘महिलांचा सन्मान’ ही संकल्पना खऱ्या अर्थाने जर सत्यात उतरावयाची असेल, तर ‘चारित्र्याचा’ मुद्दा पुढे करून आमचे होणारे खच्चीकरण आणि बदनामी थांबलीच पाहिजे, यासाठी सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी आता महिलाच पुढे आल्या आहेत. नववर्षात हा प्रयत्न कौतुकास्पद तर आहेच त्याचबरोबर तो उल्लेखनीयदेखील आहे. ‘सावित्रींच्या लेकी’चा आदर करणारा सातारा निर्माण करावयाचा आहे.
तंटामुक्ती अभियान, निर्मल ग्राम अभियान महिलांमुळेच यशस्वी झाली. मात्र, अनेकदा महिलांच्या चारित्र्याच्या वावड्या उठवून त्यांची बदनामी केली जाते. त्यांचे खच्चीकरण केले जाते. हे थांबलेच पाहिजे आणि यासाठी प्रत्येकांनी पुढे आले पाहिजे. - विक्रांत शिर्के, सातारा
नवीन वर्षाला सामोरे जात असताना महिलांविषयी आदर बाळगूया आणि आपल्या आजूबाजूच्या मंडळींनाही त्याविषयी सकारात्मक दृष्टिकोन शिकवूया. तरच खऱ्या अर्थाने सामाजिकीकरणाची प्रक्रिया वेगाने पुढे जाणार आहे. - दयानंद भोसले,
एकसळ राजकारणात महिलांना ‘चारित्र्य’ या शब्दाचा आधार घेत बदनाम केले जाते. पुरुषांनी विचारधारा बदलावी. चर्चा फक्त महिलांच्याच चारित्र्याची होते. चारित्र्याचा आधार घेत महिलेला बदनाम करणाऱ्यांना रोखले तरच खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण होणार आहे. - नीलिमा कदम, अॅवॉर्ड, सातारा
महिलांना आत्मसन्मान मिळवून देणे आपले कर्तव्य आहे. महिलांना राजकारणात त्रासच दिला जातो. त्यांच्या स्वातंत्र्यावर मर्यादा पुरुष आणतात. आम्ही धोंडेवाडी गावात जो काही सामाजिक विकास करू शकलो, त्यामध्ये महिलांचे योगदान मोठे आहे. - डॉ. माणिक शेडगे, अंगापूर