महागणपतीचे यंदा विसर्जन नाही!
By Admin | Updated: June 30, 2014 00:31 IST2014-06-30T00:25:28+5:302014-06-30T00:31:09+5:30
‘सम्राट’चा क्रांतिकारी निर्णय :

महागणपतीचे यंदा विसर्जन नाही!
पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यास सकारात्मक प्रारंभ
सातारा : हजारो सातारकरांचं श्रद्धास्थान असलेल्या आणि उंच मूर्तींची सर्वांत जुनी परंपरा असलेल्या सम्राट मंडळाच्या महागणपतीचे विसर्जन यावर्षी केलं जाणार नाही, असा क्रांतिकारी निर्णय मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी जाहीर केला. शहरातील तळ्यांच्या परिसरातील प्रदूषणाची गंभीर समस्या लक्षात घेऊन असाच निर्णय इतर मंडळांनीही घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने अजय झुटिंग, शंभू तांबोळी यांनी केले.
जवळ येत असलेला गणेशोत्सव, पावसाने दिलेली ओढ आणि तळ्यात विसर्जन केल्यामुळं निर्माण झालेल्या समस्यांच्या पार्श्वभूमीवर विसर्जनाचे पर्यायी मार्ग आणि शाड़ूच्या मूर्ती या विषयावर गेले आठवडाभर साताऱ्यात मंथन सुरू आहे. येथील कर्तव्य सोशल ग्रुप गेली अनेक वर्षे पर्यावरणस्नेही गणेशोत्सवासाठी प्रयत्न करीत आहे. या ग्रुपने आणि सातारा पालिकेने गणेशोत्सव मंडळांची बैठक रविवारी पालिकेच्या छ. शिवाजी सभागृहात घेतली. ज्येष्ठ समाजसेविका शैला दाभोलकर यावेळी उपस्थित होत्या. नगराध्यक्षा सुजाता राजेमहाडिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला उपनगराध्यक्ष अमोल मोहिते, मुख्याधिकारी अभिजित बापट, दोन्ही आघाड्यांचे पक्षप्रतोद, नगरसेवक, मंडळांचे पदाधिकारी, मूर्तिकार, व्यावसायिक उपस्थित होते.
प्रारंंभी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक-कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यांनी सांगितलेला विवेकी, पर्यावरणस्नेही उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले.
शैला दाभोलकर म्हणाल्या, ‘स्वत:चे जीवन चांगले करायचे की परंपरा जपायच्या, या द्वंद्वात सध्या सातारकर आहेत. गणपती हे बुद्धीचं प्रतीक आहे. समाज चांगला ठेवण्यासाठी माणूस म्हणून मी काय करू शकतो, याचा अशा वेळी विचार करायला पाहिजे. माणसाचा मेंदू बदलू शकतो. जो बदलाला सामोरा जातो, तोच माणूस टिकतो.’
‘गणपती बाप्पा मोरया; बदल घडला तर रोज या’ अशी घोषणा देऊन कर्तव्य सोशल ग्रुपच्या अध्यक्षा वेदांतिकाराजे भोसले म्हणाल्या, ‘मूर्तींच्या उंचीबाबत ईर्ष्या नको. पुण्यात ८० टक्के गणेशमूर्ती विसर्जित होत नाहीत. कोल्हापुरात अजूनही ‘गणोबा’ बसवतात. अंगापुरात एकच मूर्ती बसवली जाते. जे इतरत्र घडतं, ते साताऱ्यात का घडू नये? विसर्जनानंतरची मूर्तींची स्थिती ही विटंबनाच नव्हे का? मिरवणुका कितीही तास चालू दे; पण मूर्तीबाबत तडजोड नको. आपण पुढच्या पिढीला काय देणार, याचा विचार करा. अन्यथा जे गंभीर परिणाम होतील, त्याला प्रशासन नव्हे, आपणच जबाबदार असू. ज्यांना कायमस्वरूपी मूर्ती ठेवण्यासाठी जागा नाही, त्यांना पालिकेने जागा पुरवावी आणि मूर्तीच्या सुरक्षेसाठी रक्कम घ्यावी.’
पारंपरिक पद्धतीने गणेश विसर्जन आणि काळाची गरज याविषयी बैठकीत सखोल चर्चा झाली. मूर्तिकारांच्या प्रतिनिधींनी आता प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्ती तयार करायला घेतल्याचे सांगून आधीच नोटीस मिळायला हवी होती, असे सांगितले. मात्र, हे प्रयत्न गेले चार-पाच वर्षे सुरू आहेत. दरवर्षी हेच कारण दिले जाते, हे श्रीकांत शेटे यांनी निदर्शनास आणून दिले. वेदांतिकाराजेंनी तर ‘आजची बैठक ही पुढील वर्षासाठी दिलेली चौदा महिन्यांची नोटीस समजा,’ अशी कानपिचकी दिली. नगराध्यक्षांनी यावर्षीसाठीच्या गणेश विसर्जनासाठी पालिकेने घेतलेले निर्णय निर्णय सांगून पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सहकार्य करण्याचे आवाहन मंडळांना केले. शाडूच्या गणेशमूर्ती आणणाऱ्या विक्रेत्यांसाठी वेगळी व्यवस्था करण्याच्या आश्वासनाचा त्यांनी पुनरुच्चार केला. (लोकमत टीम)