कऱ्हाडात लग्न ना वरात; बाजा वाजतोय दारात !
By Admin | Updated: March 25, 2016 23:31 IST2016-03-25T20:50:02+5:302016-03-25T23:31:31+5:30
पालिकेची युक्ती : थकबाकीदारांच्या दारात पोहोचला बँड; अनेकांचे धाबे दणाणले

कऱ्हाडात लग्न ना वरात; बाजा वाजतोय दारात !
कऱ्हाड : येथील पालिकेच्या वतीने थकबाकीदारांच्या करवसुलीसाठी वेगवगळे प्रयोग केले जात आहेत. सुरुवातीला कर भरण्याची विनंती करणारी प्रसिद्धीपत्रके त्यानंतर ध्वनिक्षेपकावरून आवाहन करण्यात आले. त्यातूनही दाद न देणाऱ्यांची नावे फ्लेक्सवर झळकली. त्याहीपुढे एक पाऊल टाकत आज वसुलीपथक थेट बँडपथक घेऊनच थकबाकीदारांच्या दारात पोहोचले. त्यामुळे थकबाकीदारांची त्रेधा उडाल्याचे पाहायला मिळाले.
खरंतर पालिकेचे कर वेळेत भरणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे; पण त्याकडे अनेकजण दुर्लक्ष करताना दिसतात. पालिकेच्या वतीने आवाहन केल्यावरही त्याला प्रतिसाद देत नाहीत तेव्हा कर वसुलीसाठी पालिका व्यवस्थापनला काही नवीन कल्पना राबवाव्या लागल्या.
काही महिन्यांपूर्वीच पालिकेच्या मुख्याधिकारी पदाची जबाबदारी विनायक औंधकर यांनी स्वीकारली. आल्याबरोबरच त्यांच्यासमोर कर वसुलीचा मोठा प्रश्न उभा होता; पण त्यांनी वसुली संदर्भात सुरुवातीपासूनच कडक भूमिका घेतली. सुरुवातीला काही जणांनी ‘नव्याचे नऊ दिवस’ म्हणत त्यांची खिल्ली उडविण्याचाही प्रयत्न केला; पण त्यांनी फ्लेक्सचा बडगा उचलल्यावर अनेकांची हवा गूल झाली.
होळीचा सण झाल्याबरोबरच त्यांनी शुक्रवारपासून पालिकेचा बँडबाजा थकबाकीदारांच्या दारात धाडला त्यामुळे थकबाकीदारांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. सकाळी १० वाजल्यापासून पालिका कर्मचाऱ्यांवर हा बँड थकबाकीदारांच्या दारात पोहोचत होता. अन बँड वाजला की, त्याची चर्चा होत होती. मुख्यबाजारपेठेत हा बँड वाजू लागल्याचे समजताच इतर पेठांतील माणसांनी पालिकेत धाव घेऊन कर भरणे पसंत केले. मात्र दिवसभर बँड गावात ठिकठिकाणी फिरतच होता. (वार्ताहर)