निष्पापांना ठोकू नका !
By Admin | Updated: July 19, 2015 23:36 IST2015-07-19T22:53:55+5:302015-07-19T23:36:53+5:30
पोलीस अधीक्षकांचा इशारा : चोरीच्या अफवांमध्ये तथ्य नाही

निष्पापांना ठोकू नका !
सातारा : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांप्रमाणेच सातारा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये चोर शिरल्याच्या अफवा पसरविल्या जात आहेत. त्यांची खातरजमा केली असता त्यात तथ्य नसल्याचे आढळून आले असून, चोर समजून एखाद्या निष्पाप व्यक्तीला मारहाण केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिला आहे.कऱ्हाड, ढेबेवाडी, सांगली, शाहूवाडी येथे चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असल्याच्या अफवांचे लोण आता सातारा जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत पसरले आहे. कोकरूड येथे एक आरोपी पकडला असून, ‘आम्ही तीन हजारजण आहोत. गावकऱ्यांनी गस्त घातली तरी आम्हाला जे करायचं ते आम्ही करू,’ असे सांगितल्याचीही अफवा आहे.
संदेशांची माहिती द्या
चोरट्यांबद्दल सोशल मीडियावरून पसरविल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता आलेल्या संदेशांबाबत नजीकच्या पोलीस ठाण्याला कळविण्याचे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे. गस्त घालताना अनोळखी व्यक्ती असल्यास पूर्ण शहानिशा करून पोलिसांना कळवावे; तसेच अफवा पसरविताना कोणी आढळल्यास पोलिसांना माहिती द्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
कायदेशीर कारवाई होऊ शकते
समाजकंटकांनी खोडसाळपणे पसरविलेलेल्या या अफवांमुळे गावकरी गस्त घालत असताना एखादी अनोळखी व्यक्ती, फिरस्ता, रस्ता चुकलेली व्यक्ती, अनोळखी पाहुणा अथवा मानसिक आजाराने ग्रस्त व्यक्तीला चोर समजून मारहाण होण्याची शक्यता आहे.
यामुळे निष्पाप व्यक्तीच्या जिवाला अपाय होऊ शकतो आणि गस्त घालणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते, असे अधीक्षकांनी म्हटले आहे.