कृषी कार्यालयाला अधिकारी मिळेना!
By Admin | Updated: November 27, 2014 00:18 IST2014-11-26T22:48:07+5:302014-11-27T00:18:32+5:30
वादग्रस्त कार्यालय : खाबुगिरीत भरडतोय शेतकरी

कृषी कार्यालयाला अधिकारी मिळेना!
युनूस शेख -इस्लामपूर --शासनाच्या मुख्य आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या येथील वाळवा तालुका कृषी कार्यालयाला पूर्णवेळ अधिकारी मिळत नाही. सध्या या कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार शिराळ्याच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे आहे. महामार्गालगत वाघवाडी फाट्यावर असणारे हे केंद्र खाबुगिरीसाठी प्रसिध्द असल्याने, इथे जायचे म्हटले की शेतकऱ्याला फुल्ल टेन्शन येते. कारभाऱ्याविना सुरु असलेला इथला कारभार बेफाम आहे.
शासनाच्या अनेक विभागांपैकी एक, परंतु महत्त्वाचा विभाग म्हणून कृषी खात्याकडे पाहिले जाते. शेतकऱ्यांसंबंधीची धोरणे, योजनांची माहिती देणे, पीकपाण्यासंदर्भात मार्गदर्शन करणे, शासनाकडून अनुदानावर येणारे साहित्य, बी—बियाणे, कीटकनाशके योग्य व पात्र शेतकऱ्यांना देणे, शेतकरी विज्ञान मंडळाची स्थापना करणे, समूहशेतीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे, अतिरिक्त पाण्याचा वापर टाळण्यासाठी ठिबक सिंचन, तुषार सिंचनाचे क्षेत्र वाढविणे, शेतकऱ्यांच्या सहली यासह इतर अनेक महत्त्वाची कामे या विभागाकडून होत असतात.
मुळातच हे कृषी कार्यालय इस्लामपूर शहरापासून ४ कि.मी. इतक्या अंतरावरील महामार्गालगतच्या वाघवाडी फाटा परिसरात आहे. वीस एकरहून अधिक क्षेत्र या कार्यालयाच्या अखत्यारीत आहे. बीज-गुणन प्रक्षेत्र म्हणून १५-२0 वर्षांपूर्वी या परिसराची ख्याती होती. आता तिथे कोणत्या बी-बियाणांचे अथवा पिकाचे जनन-गुणन केले जाते, हा संशोधनाचा विषय आहे. शहराबाहेर असणाऱ्या या कार्यालयात जाऊन आपले काम होईल याची खात्री नाही. अधिकारीच भेटणार नसतील, तर काम कसे होणार, हा निराळाच भाग.
या तालुका कृषी कार्यालयाच्या कामाचे वाभाडे पंचायत समितीच्या प्रत्येक सभेत निघते. मात्र त्याची तमा या कार्यालयाला किंवा त्यांच्या वरिष्ठांना असल्याचे दिसत नाही. मध्यंतरी तत्कालीन प्रांताधिकारी स्रेहल बर्गे यांनी पाणी अडविण्यासाठी छोटी शेततळी, बंधारे बांधणे व जुनी तळी, बंधाऱ्यातील गाळ उपसून पाणी साठवणीच्यादृष्टीने उपयुक्त करणे, असा धडक कार्यक्रम राबवला. काम कृषी विभागाचे, मात्र धडपड महसूलची, अशी या कार्यक्रमाची अवस्था झाली. तालुका कृषी कार्यालय सवयीप्रमाणे या मोहिमेत उदासीन राहिल्याचेच स्पष्ट झाले. कागदोपत्री तपशील देणे, एवढाच एककलमी कार्यक्रम जोरात सुरु असतो.
या कृषी कार्यालयाचे पूर्वीचे अधिकारी नेहमीच वादग्रस्त ठरले. ते या कार्यालयात रुजू कधी झाले व बदलून कधी गेले, याचीही वाच्यता झाली नाही. आपला कारभार झाकून ठेवण्यासाठी, प्रसंगी एखाद्यावर पोलिसात तक्रार करण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. त्यांची बदली झाल्यापासून येथे पूर्णवेळ अधिकारी मिळालेला नाही, ही या कार्यालयाची शोकांतिका आहे. शेतकरी हिताची धोरणे राबविणाऱ्या या कार्यालयाची अशी अवस्था असेल, तर शासन किंवा या विभागाचे वरिष्ठ अधिकारी शेतकऱ्यांना काय सेवा देणार? हा प्रश्नच आहे.
अवकाळीचे पंचनामे नाहीत
आठ ते दहा दिवसांपूर्वी वाळवा तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातले होते. आभाळ फाटल्याच्या अवस्थेत झालेल्या मुसळधार पावसाने वाळवा परिसरातील द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले. पाच दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी शेतकऱ्यांच्या बागांमध्ये जाऊन या नुकसानीची पाहणी केली. मात्र शेतकरी नेहमी आतबट्ट्यातच रहावा, अशी धारणा असणाऱ्या तालुका कृषी कार्यालयाकडून तातडीने पंचनामे करण्याचे औदार्य दाखविण्यात आले नाही. आज चौकशी केल्यावर, पंचनाम्यांचे काम सुरु आहे, ते कधी संपेल सांगता येणार नाही, अशी उत्तरे मिळाली. अवकाळीचे नुकसान कागदावर राहण्याची शक्यता आहे.