कामगारहिताशी तडजोड नको
By Admin | Updated: February 27, 2015 00:18 IST2015-02-26T22:35:16+5:302015-02-27T00:18:09+5:30
सातारा : भारतीय मजदूर संघाचा इशारा

कामगारहिताशी तडजोड नको
सातारा : ‘मेक इन इंडिया’च्या नावाखाली विदेशी भांडवलदारांना आकर्षित करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने कामगार कायद्यात कामगारहिताचा बळी देणारे बदल करण्यास प्रारंभ केला आहे. कामगार हिताशी छेडछाड केल्यास होणाऱ्या परिणामांना मोदी सरकारच जबाबदार राहील, असा इशारा भारतीय मजदूर संघाचे जिल्हा सरचिटणीस विकास खाडे यांनी दिला. कामगार कायद्यांतील बदलांना विरोध करण्यासाठी संघटनेतर्फे गुरुवारी मोर्चा काढण्यात आला. राजवाड्यापासून सुरू झालेला मोर्चा पोलीस मुख्यालयामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. तेथे झालेल्या द्वारसभेत खाडे बोलत होते.
यावेळी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस राजेंद्र काळे, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य शामराव गोळे, जिल्हाध्यक्षा तारका शाळीग्राम, जिल्हा कार्याध्यक्ष साहेबराव वाघमळे यांनी तसेच इतरांनी कामगारांना मार्गदर्शन केले.
कायद्यात बदल करून संघटित कामगारांना असंघटित क्षेत्रात ढकलायचे आणि असंघटित कामगारांंना सामाजिक सुरक्षेचे गाजर दाखवायचे, असा खेळ मोदी सरकारने सुरू केल्याचा आरोप करून खाडे म्हणाले, ‘राज्यातील फडणवीस सरकार तर ‘चहापेक्षा किटली गरम’ अशा पद्धतीने वाटचाल करीत आहे. प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटीच्या हक्कासाठी सध्या किमान २० कामगारसंख्या आहे. त्याऐवजी किमान ५० कामगारसंख्या ठेवण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
खेळ चालू देणार नाही
पूर्वी ज्या उद्योगात ३०० ते ५०० कामगार काम करीत असत, तोच उद्योग आता यांत्रिकीकरण, संगणकीकरणातून ३५ ते ४० कामगारांत चालविला जातो. कायद्यात बदल केल्यास लेबर कोर्टाकडे जाणेही कठीण होणार आहे. कामगारांचे हितरक्षण म्हणून भारतीय मजदूर संघ हे खेळ चालू देणार नाही.