ज्ञानेश्वरी हा ज्ञानाचा सागर
By Admin | Updated: January 23, 2015 20:14 IST2015-01-23T20:14:36+5:302015-01-23T20:14:36+5:30
बाबामहाराज सातारकर : काल्याच्या प्रसादाने सोहळ्याची सांगता

ज्ञानेश्वरी हा ज्ञानाचा सागर
कऱ्हाड : ‘गीते’ची भाषा सर्वसामान्यांना समजण्यासारखी नव्हती; म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ती ज्ञानेश्वरीच्या रूपाने सोप्या भाषेत मांडली. ज्ञानेश्वरीच्या रूपाने ज्ञानाचा सागर उपलब्ध झाला आहे,’ असे निरूपण यशवंत महोत्सवाच्या सांगता कीर्तन सोहळ्यात बाबा महाराज सातारकर यांनी केले़ येथील प्रीतिसंगमावर पाच दिवस नामाचा गजर यशवंत महोत्सवाच्या निमित्ताने हजारोंना ऐकायला मिळाला़ यात बाबा महाराज सातारकर, भगवती महाराज, चिन्मय महाराज आदींची सुश्राव्य कीर्तने झाली़ याचा समारोप बाबा महाराजांच्या काल्याचे कीर्तनाने झाला़ यावेळी यशवंत बँकेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती़
बाबा महाराज म्हणाले, ‘ज्ञानेश्वरीचे मूळ गीतेत आहे. गीता हे सर्व अनुभूतीचे सार आहे, ज्ञानाचे भांडार आहे; पण ज्ञानाची उपलब्धता नसेल, तर त्याचा उपयोग शून्य आहे़ ज्ञानाची उपलब्धता हवी म्हणून भगवद्गीता श्री कृष्णांनी सांगितली़ गीतेतून ज्ञानाचा त्यांनी पाया रचला तर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहून कळस चढविला. निर्गुण, निराकार देव ज्ञानेश्वर महाराजांनी भक्तांसाठी सगुण साकार केला.’ शहरातून भाविकांनी सोबत आणलेल्या प्रसादाचे काल्याच्या कीर्तनानंतर वाटप करण्यात आले. (प्रतिनिधी)
भगवंतकृपेमुळे कृष्णाकाठी सलग सेवा
कीर्तन समारोपानंतर बाबा महाराज यांनी यशवंत महोत्सवाबद्दल उपस्थितांपुढे आपल्या भावना व्यक्त केल्या. यशवंत परिवाराशी असलेले ऋणानुबंध व भगवंताची कृपा यामुळेच सलग पाचव्या वर्षी कृष्णा तीरावर कीर्तन होत असल्याचे त्यांनी सांगितले.