कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत ज्ञानेश्वरी पारायण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:37 IST2021-02-13T04:37:57+5:302021-02-13T04:37:57+5:30
वडूज : वडूजमध्ये सालाबादप्रमाणे श्री सिद्धिविनायकाच्या सभामंडपात अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कोरोनाकाळातील ...

कोरोना मार्गदर्शक सूचनांचे पालन करीत ज्ञानेश्वरी पारायण
वडूज : वडूजमध्ये सालाबादप्रमाणे श्री सिद्धिविनायकाच्या सभामंडपात अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त ज्ञानेश्वरी ग्रंथ पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कोरोनाकाळातील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करीत हा सोहळा होत आहे. शेकडो वाचकांच्या मांदियाळीमुळे वडूज परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे. सोमवार, दि. १५ रोजी गणेश जयंतीदिनी पारायण मंडपातच ठरावीक लोकांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. यंदाच्या वर्षी रथोत्सव रद्द करण्यात आला आहे.
३८ वर्षांतून पहिल्यांदाच रविवार, दि. ७ पासून पारायण मंडपात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायण सुरू आहे. दररोज पहाटे व सायंकाळी साडेपाचला आरती होते. सकाळी आठ ते दुपारी बारा या वेळेत ज्ञानेश्वर ग्रंथ वाचन होते. पारायण मंडळाभोवती कोरोनाकाळातील शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे फलक लावून काटेकोरपणे पालन केले आहे. सर्व धार्मिक पद्धतीने रविवार, दि. ७ पासून ज्ञानेश्वरी वाचनासाठी विजय महाराज शिंदे यांनी व्यासपीठ सांभाळले. गर्दी टाळण्यासाठी शहरातील भक्तांनी यावर्षी घरोघरी ज्ञानेश्वरीचे वाचन सुरू ठेवले आहे.
यामध्ये युवक, युवती व वयोवृध्दांचा समावेश आहे. सोमवार, दि. १५ रोजी गणेश जयंतीनिमित्त सकाळी सातला सांगता होणार आहे. सकाळी नऊला काल्याचे कीर्तन व दहीहंडी, सकाळी अकराला जयंत कुलकर्णी यांचे श्री गणेश जन्माचे कीर्तन होणार आहे. दुपारी एक वाजेला श्रींची व ज्ञानेश्वरांची मूर्ती पालखीतून रथात ठेवण्यात येणार आहे. रथोत्सवाला परवानगी नसल्याने रथ जागेवरच थांबविण्यात येणार आहे. वडूज येथील शिवाई ग्रुपतर्फे भाविकांना लाडू प्रसाद देण्यात येणार आहे.
१२वडूज-पारायण
वडूज येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला आहे. यामध्ये शेकडो नागरिक सहभागी झाले आहेत. (छाया : शेखर जाधव)