रेडिमेड फराळातून झटपट दिवाळी..!
By Admin | Updated: November 11, 2015 23:46 IST2015-11-11T21:35:03+5:302015-11-11T23:46:58+5:30
घरात नकोय तेलकट वास : नोकरदार महिलांनी शोधला नवा मार्ग, स्वतंत्र कुटुंब पध्दतीमुळेही एकट्या महिलेवर वाढला बोजा--लोकमत सर्वेक्षण

रेडिमेड फराळातून झटपट दिवाळी..!
सातारा : दिवाळीत गोड-धोड, फराळ घरच्या घरी करण्याची इच्छा आहे. मात्र, यंदा दिवाळीचे प्रत्येक दिवस स्वतंत्र आला असल्याने सात दिवसांची आली असली तरी केवळ दोन दिवस सुटी असल्याने नाईलाजास्तव असंख्य गृहिणींनी तयार फराळ घरी आण्याला पसंती दिली आहे. दिवाळी म्हटलं की, घरात पै-पाहुणे, बहिणी, भाच्चे, नातवंडे असा गोतावळा तयार होतो. त्यामुळे लाडू, करंच्या, शंकरपाळ्या, चिवडा अशा खमंग फराळ बनविला जातो. ग्रामीण भागात पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती होती. त्यामुळे साहजिकच राबणारे हात जास्त होते. बदलत्या काळानुसार कुटुंबव्यवस्था बदलली आहे. त्यामुळे विभक्त कुटुंब निर्माण झाल्याने घरात फक्त एकच गृहिणी आहे. त्यामुळे तिच्यावरच कामाचा ताण वाढत आहे. त्याचप्रमाणे संसाराचा गाडा हाकण्यासाठी तिनं घरातून बाहेर पडून नोकरीही स्वीकारली आहे. यंदा दिवाळी सणाचा कालावधी वाढला आहे. वसुबारसापासून शनिवारी सुरू झालेली दिवाळी शुक्रवारी भाऊबीजेने संपत आहे. चांगले सात दिवस सण असला तरी या काळात रविवारी साप्ताहिक सुटी अन् पाडवा किंवा लक्ष्मीपूजनाची सुटी असणार आहे. केवळ दोनच दिवस सुटी असल्याने त्यातील रविवार खरेदीत गेला. त्यामुळे गृहिणींना तारेवरची कसरत करावी लागली. घरात फराळ करायचा म्हटला तर साहित्य आणणे, वाळवणे, दळणे, करणे, तळणे ऐवढा उद्योग करण्यास वेळ नसल्याने बाहेरून फराळ आणणे अनेक गृहिणींनी पसंत केले आहे. सातारा शहरातील चौकाचौकात, मुख्य बाजारपेठेतील मिठाईच्या दुकानात तयार मिठाई, फराळ विक्रीस आहेत. तेथून काही लोक खरेदी करत आहेत. दुकानातून तयार फराळ मिळत असला तरी काही गृहिणींचा त्याला विरोध आहे. तेथे वापर असलेले पदार्थ, तेल चांगल्या दर्जाचे असतील का? याचा नेम नाही. पुन्हा आजारी पडणं आणि दवाखान्यात जाण्यापेक्षा आचाऱ्याला घरी बोलावून किंवा त्याच्याकडून तयार करून घेण्यावर सर्वाधिक पसंती दिली जात आहे. आचाऱ्याकडून फराळ बनविताना त्याला माल दिल्यानंतर प्रतिकिलो दराने ते बनवून मिळत आहेत. यासाठी मजुरीचा जादा दर द्यावा लागत असला तरी रेडिमेड फराळात साखरेचा वापर जास्त झालेला असतो. त्यामुळे वजनात कमी मिठाई भरते. उलट तयार करताना हव्या त्या प्रमाणात साखर टाकता येत असल्याने भरपूर पदार्थ तयार होतात, असा त्यांचा समज आहे. (प्रतिनिधी) यंदा दिवाळीचे काही पदार्थ घरी केले. मात्र चिवडा, मोतीचुराचा लाडू आणि बालुशाही हे पदार्थ आचाऱ्याकडून बनवून घेतले. मुलांच्या शाळेला उशीरा लागलेल्या सुट्या कामाची तारांबळ म्हणून करंजी, शंकरपाळी, बेसन लाडू, अनारसे, चकली हे मी घरीच केले. स्वत: केलेली दिवाळी खाण्याची मजा काही और असते. - हर्षल बाबर, रविवार पेठ, सातारा पारदर्शक पॅकिंगची क्रेझ कोणतीही वस्तु घेताना ग्राहक आधी ती डोळ्याने ताडतो आणि मगच खरेदी करतो. मार्केटिंगच्या आजच्या जमान्यात ग्राहकांची ही सवय ओळखून बहुतांश फराळ व्यापाऱ्यांनी यंदा पारदर्शक पिशव्यांमध्ये फराळाचे पदार्थ पावशेर पासून किलोपर्यंत पॅक करून ठेवले आहेत. मागणीनुसार हे पॅकिंग ग्राहकांना दिले जाते. संयुक्त कुटुंबाची कमतरता भासतेय! संयुक्त कुटुंब पध्दतीत घरात महिलांची संख्या मोठी होती. दिवाळीत तोंडावर घरातील आजी, आई आणि काकु एकत्र येवून सर्व पदार्थ घरच्या घरी करत होते. आता स्वतंत्र कुटूंब असल्यामुळे कामाची विभागणी होत नाही, त्यामुळे संयुक्त कुटुंबाची कमतरता भासतेय.