निवडणुकीमुळे पालिका तिजोरीत ७९ लाखांची दिवाळी !
By Admin | Updated: November 2, 2016 23:47 IST2016-11-02T23:47:43+5:302016-11-02T23:47:43+5:30
प्रशासनाची शक्कल आली कामी : ना हरकत प्रमाणपत्रासाठी अगोदर थकबाकी वसुली; अनुमोदकांनाही डबल लॉटरी

निवडणुकीमुळे पालिका तिजोरीत ७९ लाखांची दिवाळी !
सातारा : इच्छुक उमेदवारांना ना हरकत प्रमाणपत्र देताना मागील थकबाकी भरून घेतल्याने पालिकेच्या तिजोरीत यंदा तब्बल ७९ लाख थकबाकी जमा झाली आहे. पालिका प्रशासनाने लढविलेली शक्कल कामी आल्याने ही निवडणूक वसुली विभागासाठी सार्थक ठरली आहे.
अपक्ष उमेदवारांचा अर्ज भरताना पाच अनुमोदक देणाऱ्या व्यक्तींनी पालिकेची थकबाकी भरलेली असावी, असा नियम पालिका प्रशासनाने काढला होता. यावेळी बहुतांश इच्छुक उमेदवारांकडून विरोधही झाला; परंतु अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या भीतीने अनेकांनी याकडे कानाडोळा करून थकबाकी जमा केली.
अनेकवेळा दारोदारी वसुलीसाठी फिरूनही अनेकजण पालिकेला ठेंगा दाखवित होते. हा पूर्वानुभव वसुली अधिकाऱ्यांना माहिती असल्याने पालिका निवडणुकीच्या निमित्ताने वसुलीची संधी चालून आली होती. अपक्ष उमेदवाराला अनुमोदक व्यक्तीने घरपट्टी भरलेली सक्तीची असावी, असा नियम आहे की नाही, यावर चर्चा न करता पालिका प्रशासनाने वसुलीची मोहीम हाती घेतली. अनेकांनी घरपट्टी भरलेली नव्हती, अशा मिळकतदारांची घरपट्टी नाईलाजास्तव इच्छुक उमेदवारांना भरावी लागली.
त्यामुळे अनुमोदक झालेल्या व्यक्तींनीही आता डबल लॉटरी लागल्याने अगदी तेही आनंदात अपक्ष उमेदवाराला साथ दिल्याचे पाहायला मिळाले. इतक्या कमी वेळात ७९ लाखांची विक्रमी थकबाकी जमा झाल्याने वसुली विभागाचीही दिवाळी झाली आहे. या वर्षाचे टार्गेट पूर्ण होत आले असून, आता आणखी काही थकबाकीदारांची नावे आहेत. निवडणूक पार पडल्यानंतर थकबाकीची मोहीम हाती घेतली जाणार आहे. (प्रतिनिधी)
९५३ जणांना
ना हरकत दाखला
आॅनलाईन अर्ज भरताना पालिकेचा ना हरकत दाखला आवश्यक होता. त्यामुळे प्रत्येक इच्छुक उमेदवाराला हा दाखला घेण्यासाठी थकबाकी भरणे सक्तीचे केले होते. महिनाभरात ९५३ जणांना पालिकेने ना हरकत दाखला दिला. त्यामुळे यातून मोठ्या प्रमाणात वसुली जमा झाली.