प्रभाग ‘वाय-फाय’, नगरसेवक ‘हाय-फाय’!
By Admin | Updated: April 24, 2016 23:40 IST2016-04-24T21:54:32+5:302016-04-24T23:40:23+5:30
नागरिकांचे गाऱ्हाणे : ठरवून बिनविरोध नगरसेवक लादू नका; लोकशाहीने दिलेला मताधिकार बजावू द्या

प्रभाग ‘वाय-फाय’, नगरसेवक ‘हाय-फाय’!
सातारा : पालिकेतील दोन्ही सत्ताधारी आघाड्यांचे नेते जेथे राहतात, त्याच प्रभागातील दोन ब्रिटिशकालीन पुलांच्या नूतनीकरणाला वारंवार स्थगिती कशी मिळते? लोकसंख्या आणि रहदारी वाढत चाललेली असताना या अरुंद पुलांवर अपघात झाले तर जबाबदार कोण? अशा प्रश्नांची सरबत्ती कोटेश्वर चौकाजवळील नागरिकांनी केली. तसेच, चार वर्षं वॉर्डात न फिरकणारे नगरसेवक नेत्यांनी आमच्यावर लादू नयेत. आम्हाला लोकशाहीने दिलेला मताधिकार बजावू द्यावा, असे काही नागरिकांनी खुलेपणाने सांगितले.
‘लोकमत आपल्या प्रभागात’ या सुमारे पाच महिने सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची सांगता रविवारी प्रभाग पाचमध्ये करण्यात आली. खासदार उदयनराजे भोसले यांचे ‘जलमंदिर’ आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे ‘सुरुची बंगला’ हे निवासस्थान याच प्रभागात आहे.
मनोमिलन पॅटर्नमुळे अनेक नगरसेवक बिनविरोध निवडून आले असून, या निवडींना चार वर्षे उलटून गेल्यावर प्रभाग पाचमध्ये काही ठिकाणी समाधान तर काही ठिकाणी रोष दिसून आला. मंगळवार तळे, व्यंकटपुरा पेठ, चिमणपुरा पेठ आदी भागांमधील नागरिकांनी किरकोळ अडचणी वगळता नगरसेवकांच्या कामाविषयी समाधान व्यक्त केले. काही ठिकाणी मात्र बिनविरोध निवडींमुळे समस्यांचे गांभीर्य नगरसेवकांच्या लक्षात येत नसल्याचा सूर आळवण्यात आला. शहरातील या पहिल्यावहिल्या ‘वाय-फाय’ प्रभागातील काही मूलभूत प्रश्न मात्र रखडले आहेत.
शुक्रवार पेठेतील कोटेश्वर चौकातून शाहूपुरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन मोठे पूल आहेत. हे पूल ब्रिटिशकालीन असून, त्यांची मुदत संपलेली आहे. या पुलांचे रुंदीकरण आणि उंची वाढविण्याचे प्रस्ताव अनेक वर्षे धूळ खात पडले आहेत. नागरिकांच्या सांगण्यानुसार, या पुलांच्या कामाचे तीन वेळा टेंडर निघाले आणि रद्दही झाले. या महत्त्वाच्या कामाला वारंवार स्थगिती मिळतेच कशी, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला.
कोटेश्वर चौकाकडून ओढ्याकडे जाणारी गटारे खोल आणि उघडी आहेत. तसेच चौकात गतिरोधक नाहीत. पथदिवेही बंद असतात. त्यामुळे येथे वारंवार छोटे-मोठे अपघात होतात. ‘अनेकदा गटारात गेलेल्या दुचाकीस्वाराला आम्ही बाहेर काढतो,’ असे सांगणारे नागरिक येथे भेटले. ‘गेल्या चार वर्षांत नगरसेवक आमच्या गल्लीत फिरकले नाहीत. अनेकांना नगरसेवक कोण हेही माहीत नाही. त्यामुळे नेत्यांनी ठरवून बिनविरोध नगरसेवक यापुढे लादू नयेत. आम्हाला मताधिकार बजावू द्यावा,’ असा सूर काहींनी लावला.
मटंगे पुलाजवळील ओढ्यात कचऱ्याचे साम्राज्य, सिटीबसच्या वेळी-अवेळी आणि कमी फेऱ्या, पोस्ट आणि पोलिस चौकीसाठी मंगळवार तळ्याजवळ बांधलेल्या बहुउद्देशीय इमारतीत दोन्ही यंत्रणांची कार्यालये अद्याप नसणे, व्यंकटपुरा पेठेत रात्री-अपरात्री गुरगुरणाऱ्या कुत्र्यांची फौज, अनंत इंग्लिश स्कूल चौकात शाळा सुटल्यावर होणारी गर्दी आणि वेगाने जाणारे बाइकर्स, रामाचा गोट येथील त्रिशंकू स्थिती निर्माण झालेल्या भागातील रखडलेला रस्ता, या रस्त्यावरील अतिक्रमणे, ओढ्यालगत भिंती नसल्याने पावसाळ्यात घरात शिरणारे पाणी, व्यंकटपुरा पेठेत तब्बल ४२ वर्षे रेंगाळलेला ड्रेनेजचा प्रश्न, त्यामुळे डासांची उत्पत्ती आणि आजारांचा धोका, गोखले हौद ते गडकर आळी रस्त्यावर वारंवार तुंबणारी उघडी गटारे, बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकणाऱ्यांना तक्रारी करूनही मिळणारे अभय अशा काही समस्या नागरिकांनी सांगितल्या. अनेकांना मंगळवार तळ्याचे सुशोभीकरण होऊन एक ‘पिकनिक स्पॉट’ विकसित व्हावा असे वाटते. (लोकमत चमू)