जिल्ह्याचा पारा उतरला
By Admin | Updated: December 2, 2014 23:19 IST2014-12-02T22:05:38+5:302014-12-02T23:19:54+5:30
थंडीची लाट : महाबळेश्वरला हिमकणांची प्रतीक्षा

जिल्ह्याचा पारा उतरला
सातारा : महाराष्ट्राचे नंदनवन व थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या महाबळेश्वरचा पारा दिवसेंदिवस खालावत आहे. याठिकाणचे किमान तापमान १३ अंश सेल्सियसपर्यंत आले असून रात्रीच्या वेळी तापमानात अधिकच घट होत आहे. काही दिवसांत महाबळेश्वरात हिमकण दिसण्याची शक्यता असल्याने पर्यटकांमध्येदेखील कुतूहल वाढले आहे.
जिल्ह्यात सर्वत्र थंडीचे प्रमाण वाढले असून प्रामुख्याने महाबळेश्वरमध्ये थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे. गेल्या महिन्यात २६ नोव्हेंबर रोजी येथे १३ अंश सेल्सियस इतक्या कमी तापमानाची नोंद याठिकाणी करण्यात आली आहे. डिसेंबर महिन्यात या ठिकाणचा पारा आणखीनच उतरतो. त्यामुळे हिमकण पाहण्यासाठी येथे पर्यटकांची दरवर्षी गर्दी होते. महाबळेश्वरसह जिल्ह्यातील वाई, सातारा, खंडाळा अशा प्रमुख शहरांमध्ये सध्या थंडीची लाट पसरली असून, तापमान काही प्रमाणात खालावत आहे. याठिकाणी पहाटे व रात्रीच्या वेळी कडाक्याची थंडी पडत असून पारा १३ ते १४ अंश सेल्सियस पर्यंत उतरत आहे. (प्रतिनिधी)
तालुक्यांचे किमान तापमान अंश सेल्सियसमध्ये
महाबळेश्वर १३
सातारा १४
कऱ्हाड१४
फलटण१४
वाई१३
खंडाळा१३
पाटण१५
कोरेगाव१४
खटाव१४
जावळी१३
माण१५
हिमणकांचे दर्शन लवकरच
महाबळेश्वरमध्ये डिसेंबर महिन्यात पारा ४ अंश सेल्सियस पर्यंत उतरतो. यामुळे येथील दवबिंदू गोठण्याची प्रक्रिया सुरू होते. दवबिंदू गोठल्यानंतर त्यांचे हिमकणांत रूपांतर होते. सध्या थंडीचे प्रमाण पाहता येत्या काही दिवसांत महाबळेश्वरमध्ये हे चित्र दिसून येणार आहे.