जिल्हा कारागृहाचे स्थलांतर अशक्य !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2015 22:59 IST2015-08-11T22:59:53+5:302015-08-11T22:59:53+5:30
बोरवणकर यांची स्पष्टोक्ती : पुरुष बंदिवानांसाठी लवकरच जादा बराकी

जिल्हा कारागृहाचे स्थलांतर अशक्य !
सातारा : शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या कारागृहाच्या परिसरात नियमांमुळे खुंटलेल्या विकासाच्या मुद्द्यावरून पालिकेत गरमागरम चर्चा झाल्या. आमदारांनीही जिल्हा कारागृह शहराबाहेर हलविण्याची मागणी केली; मात्र नजीकच्या काळात असे काहीही घडणे शक्य नसल्याचे संकेत राज्याच्या अतिरिक्त पोलीस महासंचालक (कारागृह) मीरा बोरवणकर यांनी मंगळवारी दिले.साताऱ्याच्या दौऱ्यावर असणाऱ्या बोरवणकर यांनी जिल्हा कारागृहाची नियमित तपासणी केली. सकाळी साडेनऊ ते अकरा या वेळेत पाहणी केल्यानंतर कारागृहाबाहेर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हा कारागृह सध्याच्या जागेपासून अन्यत्र स्थलांतरित करणे अनेक कारणांनी अव्यवहार्य असल्याचे सांगताना त्या म्हणाल्या, ‘कारागृह स्थलांतराचा प्रस्ताव अद्याप आमच्याकडे आलेला नाही. तथापि, कारागृह पोलीस मुख्यालयाजवळच असायला हवे. यामुळे बंदिवानांना न्यायालयात तसेच रुग्णालयात नेताना-आणताना, पोलिसांचा ‘एस्कॉर्ट’ तातडीने उपलब्ध होतो. त्याचप्रमाणे कारागृह रुग्णालयापासूनही जवळ असावे, असे माझे मत आहे.’सातारा जिल्हा कारागृहातील कामकाज चांगले असून, अंतर्गत स्वच्छताही उत्तम असल्याचे सांगून कैद्यांच्या संगणकीकृत डेटाबेसविषयी बोलताना त्या म्हणाल्या, ‘चार मोड्यूलमध्ये संगणकीकरणाचे काम सुरू आहे. ‘प्रिझन’ नावाच्या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने राज्यातील कैद्यांची माहिती संगणकीकृत करण्यात येत असून, ती शासनाच्या सर्व्हरमध्ये सेव्ह केली जात आहे. सातारा कारागृहातील कर्मचाऱ्यांनाही या प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्यानंतर येथील बंदिवानांची माहितीही आॅनलाइन उपलब्ध होईल.’१९९६ ते १९९९ या काळात सातारच्या जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहणाऱ्या मीरा बोरवणकर यांनी आपल्याला सातारला यायला आवडते, असे सांगितले. पूर्वीपेक्षा यावेळी शहराची लोकसंख्या थोडी वाढल्याचे दिसले, असे सांगून त्या म्हणाल्या, ‘सातारचे सध्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख हे तरुण आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असून, ते अतिशय उत्तम काम करीत आहेत.’ यानंतर बोरवणकर यांनी पोलीस कवायत मैदानाला भेट दिली. (प्रतिनिधी)
नव्या बराकीसाठी निधी
यावेळी बोलताना बोरवणकर म्हणाल्या, ‘पुरुष बंदिवानांसाठी सध्याची जागा अपुरी पडत आहे. सध्या १७० बंदिवानांची सोय येथे उपलब्ध असताना प्रत्यक्षात सुमारे तीनशे बंदिवान आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणे झाले असून, नव्या बराकीसाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून देण्याचे त्यांनी मान्य केले आहे. बराकीबरोबरच सोलर पॅनेलही उभारण्यात येणार आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक कारागृहात मोबाईल जॅमर, सीसीटीव्ही कॅमेरे तसेच कर्मचाऱ्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देण्यास अनुकूल आहेत.’