जिल्हा रुग्णालय राज्यात प्रथम
By Admin | Updated: November 28, 2014 00:15 IST2014-11-27T21:57:26+5:302014-11-28T00:15:36+5:30
उत्कृष्ठ सेवा : ४५०० हून अधिक केल्या शस्त्रक्रिया

जिल्हा रुग्णालय राज्यात प्रथम
सातारा : रुग्णालयातील अनेक अडचणीमधून यशस्वीपणे मार्ग काढत सातारा जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला गुणवत्तापूर्वक सेवा जिल्हा रुग्णालयातून देण्याची मोठी जबाबदारी पार पाडून राज्यात जिल्हा रुग्णालयास प्रथम क्रमांकाचे मानांकन मिळाले, हा बहुमान सातारा जिल्हावासीय नागरिकांचा अभिमानास्पद निश्चित आहे,’ असे गौरवोद्गार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी काढले. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. उज्ज्वला माने, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रामचंद्र जाधव, प्रशासकीय अधिकारी वडनेरकर, अधिसेविका वीणा कर्पे, नर्सिंग कॉलेजच्या मुग्धा सोहनी आदी उपस्थित होते.
डॉ. जगदाळे म्हणाले, ‘राज्याच्या आरोग्य विभागाकडून महाराष्ट्रामधील ३४ जिल्ह्यांचे विविध रुग्णसेवेचे मूल्यांकन केले जाते. त्यासाठी बाह्यरुग्ण संख्या, आंतररुग्ण संख्या, प्रसूती, प्रसूती शस्त्रक्रिया, लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या लसीकरण, कुटुंब कल्याण सेवा, डायलेसिस विभाग, अपघात विभाग, हिमॅटालॉजी विभाग आदी माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सेवा, रक्तपेढी, लॅबॉरेटरी, एक्स-रे, सोनोग्राफी आदी सुविधा तसेच मोठमोठ्या शस्त्रक्रिया, राजीव गांधी कार्यक्रम, एड्स प्रतिबंध विभागाअंतर्गत सेवा, परिसर स्वच्छता, रुग्णालयीन स्वच्छता आदी बाबींचे मूल्यांकन केले. राज्याचे उपसचिव तसेच राज्याच्या आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव यांनीही जिल्हा रुग्णालयाची पाहाणी केली होती.’
जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांसाठी शासकीय अत्यंत उपयोगी असे जिल्ह्यातील सर्वात मोठे रुग्णालय आहे. याठिकाणी जिल्ह्यातून गोरगरीब रुग्ण येत असतात.
त्यासाठी अत्यंत उपयोगी असे वेगवेगळी आरोग्य सेवा देणारे विभाग आहेत. डायलेसिस विभाग, अपघात विभाग, अतिदक्षता विभाग, प्रसूती विभाग, शस्त्रक्रिया विभाग आदी विभागाअंतर्गत उपचार दिले जातात. (प्रतिनिधी)
घरोघरी तपासणी
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत मागील वर्षी नऊ लाख मुलांची मोफत आरोग्य तपासणी प्रत्येक गावी जाऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली. त्याअंतर्गत आतापर्यंत जवळपास ४५०० मोठ्या शस्त्रक्रिया मोफत केल्या करण्यात आल्या. हृदयशस्त्रक्रिया, दुभंगलेले ओठ, तिरळेपणा, अस्थिव्यंग, मूत्र आदींचा त्यामध्ये समावेश आहे.