जिल्हा कोरोना विस्फोटाच्या मार्गावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:40 IST2021-04-04T04:40:07+5:302021-04-04T04:40:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी सप्टेंबरपर्यंत कोरोनाचा कहर होता. मात्र, त्यानंतर बाधित आणि मृतांचे प्रमाण कमी झाले. ...

District Corona on the verge of explosion! | जिल्हा कोरोना विस्फोटाच्या मार्गावर !

जिल्हा कोरोना विस्फोटाच्या मार्गावर !

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी सप्टेंबरपर्यंत कोरोनाचा कहर होता. मात्र, त्यानंतर बाधित आणि मृतांचे प्रमाण कमी झाले. असे असतानाच फेब्रुवारीपासून बाधितांची संख्या वाढली आहे. मार्च महिन्यात तर ६ हजार ५४८ रुग्ण वाढले तर ५१ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संशयावरून आतापर्यंत ४ लाखांवर लोकांची चाचणी करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना स्थिती विस्फोटाच्या मार्गावर जात असल्याचे दिसू लागले आहे.

जिल्ह्यात गेल्यावर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला होता. सुरुवातीला कोरोनाबाधितांचे प्रमाण खूपच कमी होते. कधी १०, २० तर कधी ५० पर्यंत दिवसाला रुग्ण आढळत होते. मात्र, मे महिना सुरू झाल्यापासून कोरोना रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत गेले. जून महिन्याच्या उत्तरार्धापासून तर कोरोनाबाधितांची संख्या दिवसाला शेकडोच्या पटीत वाढत गेली.

जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांत तर कोरोनाचा कहर होता. कधी ६००, ७०० तर कधी ८०० च्यावरही बाधित सापडू लागले. त्यामुळे प्रशासनाचीही चिंता वाढली आहे. तर सप्टेंबरअखेर बाधितांचा आकडा ३७ हजार पार झाला आहे. तसेच मृत्युमुखी पडणाऱ्यांचीही संख्या वाढली आहे. असे असलेतरी ऑक्टोबर महिन्यापासून बाधित आणि मृतांचे प्रमाण कमी होत गेले.

नोव्हेंबर महिना दिलासादायक ठरला. ऑक्टोबरच्या तुलनेत निम्म्याने बाधित आणि मृत कमी झाले. या महिन्यात अवघे ४ हजार ४५० बाधित निष्पन्न झाले. तर ६ हजार ६८९ जणांनी कोरोनावर मात केली. यामुळे जिल्ह्यातील बाधितांचे प्रमाण घटल्याचे दिसून आले. तर १६३ जणांचाच कोरोनाने मृत्यू झाला होता. डिसेंबरमध्ये तर हे प्रमाण आणखी कमी झाले. बाधित फक्त ३ हजार ५५२ वाढले तर ३ हजार ३१२ जण मुक्त झाले. तर ६८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

जानेवारी महिन्यात तर डिसेंबरच्या तुलनेत प्रमाण निम्म्यावर आले. नवीन १ हजार ४०२ रुग्णांची नोंद झाली. त्याचबरोबर २६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. असे असलेतरी कोरोनामुक्त ९७९ जण झाले होते. जानेवारीपर्यंत कोरोना स्थिती नियंत्रणात होती. मात्र, फेब्रुवारी सुरू होताच बाधितांची संख्या झपाट्याने वाढली. तर कोरोनामुक्तांची संख्या कमी झाली. त्याचबरोबर मृतांचा आकडाही वाढला.

फेब्रुवारी महिन्यातील २८ दिवसांत २ हजार ४९१ नवीन रुग्ण स्पष्ट झाले. जानेवारीचा विचार करता जवळपास ११०० नवीन रुग्णांची भर पडली. तर ३६ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे फेब्रुवारीत मृतांचा आकडाही १० ने वाढल्याचे दिसून आले. तर १ हजार ८५५ जण बरे झाले. तर मार्च महिन्यात स्थिती अधिक कठीण झाली.

मार्च महिन्यात कोरोनाचे नवीन ६ हजार ५४८ रुग्ण आढळले आहेत. फेब्रुवारीच्या तुलनेत २ हजार ४९० बाधित वाढले. तर ५१ जणांचा मृत्यू झाला. मागील महिन्यापेक्षा १५ ने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तर १ हजार २२३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

चौकट :

कोरोनामुक्तांचा आकडा ६१ हजारांजवळ

जिल्ह्यात फेब्रुवारीअखेर ५८ हजार ९९३ कोरोनाचे रुग्ण स्पष्ट झाले. तर आतापर्यंत ६७ हजारांवर बाधित संख्या पोहोचली आहे. तसेच ६० हजार ५७५ जणांनी कोरोनावर मात केली. त्याचबरोबर आतापर्यंत १ हजार ९१२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात ४ लाख ११ हजार ५५४ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आलेली आहे.

...............

Web Title: District Corona on the verge of explosion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.