जिल्हा मध्यवर्ती बँकेची ६६७ मते वगळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:46 IST2021-09-04T04:46:59+5:302021-09-04T04:46:59+5:30
सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी पूर्वीच्या २ हजार ६३० मतदारांपैकी ६६७ मते वगळण्यात आली असून १ हजार ९६३ ...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची ६६७ मते वगळली
सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी पूर्वीच्या २ हजार ६३० मतदारांपैकी ६६७ मते वगळण्यात आली असून १ हजार ९६३ मते उरली आहेत. कच्ची यादी प्रसिध्द केल्यानंतर पहिल्याच दिवशी मतदारयादीवर ६ हरकती दाखल झाल्या आहेत.
बँकेच्या निवडणुकीसाठी ठराव प्रक्रिया पूर्ण झाली असून आता मतदार यादी अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. कोल्हापूर येथील विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांनी जिल्हा बँकेकडून प्राप्त झालेली यादी तपासून शुक्रवारी प्रसिध्दीसाठी येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे पाठविली होती. या कार्यालयात पाहणीसाठी ही मतदारयादी ठेवण्यात आली आहे.
या मतदार यादीवर हरकती मागविण्यात आलेल्या होत्या. मयत सभासदांची नावे असलेल्या चार, अधिकृत मतदार असतानाही यादीमधील नाव वगळल्याबाबत एक आणि राजीनामा दिलेल्या मतदाराचे नाव यादीत असल्याने एक, अशा एकूण सहा हरकती नोंदविण्यात आल्या आहेत.
दि. १३ सप्टेंबरपर्यंत हरकती मागविण्यात येणार आहेत. या हरकतींवर दि. १३ ते २३ सप्टेंबर या कालावधीत सुनावणी घेण्यात येईल. तसेच दि. २७ सप्टेंबर रोजी अंतिम मतदारयादी प्रसिध्द केली जाणार आहे. त्यानंतर सहकार प्राधिकरणाचा आदेश होताच निवडणुकीचा कार्यक्रम लागणार आहे.
चौकट..
निवडणुकीला मुदतवाढ मिळण्याची शक्यता
रिझर्व्ह बँकेकडून बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट लागू करण्याबाबत सूचना केलेल्या आहेत. हा कायदा लागू केल्यास निवडणुकीला मोठा कालावधी लागू शकतो. आता सहकार कायद्याप्रमाणे निवडणुका घेऊन त्यानंतर पुन्हा उपविधी दुरुस्ती करून बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट लागू करण्याची तयारी राज्य शासनाने केली आहे. राज्य शासनाने यासंदर्भात नेमलेली समिती काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.
अवघ्या दोन मतांचा मतदारसंघ
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी कृषी पुरवठा सोसायटी, खरेदी-विक्री संघ, कृषी उत्पादन प्रक्रिया, नागरी बँका/पतसंस्था, गृहनिर्माण/दूध उत्पादक, औद्योगिक विणकर/मजूर फेडरेशन असे ६ मतदारसंघ आहेत. यामधील खरेदी-विक्री संघातून एका संचालकाची नियुक्ती होणार आहे. या मतदारसंघामध्ये उमेदवार एक अन् मतदार दोन अशी स्थिती आहे. मतदारांमध्ये वाईचे आमदार मकरंद पाटील व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निकटवर्तीय राजू भोसले यांचा समावेश आहे.