जिल्हा बँक म्हणजे राजकीय अड्डा..!
By Admin | Updated: April 28, 2015 23:45 IST2015-04-28T22:40:12+5:302015-04-28T23:45:46+5:30
उदयनराजे : स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतही विरोध पहायला मिळणार

जिल्हा बँक म्हणजे राजकीय अड्डा..!
सातारा : यंदाच्या डीसीसी निवडणुकीत थोडे वेगळे चित्र पहायला मिळाले तर काही नवल वाटणार नाही, कारण स्वार्थी, केंद्रीत विचारांना आता विरोध सुरु झाला असून, तो विरोध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या भविष्यातील निवडणुकांतही सर्वत्र पहायला मिळेल, असे खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
सहकारातील तत्त्वानुसार, जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा बँकेत राजकारणाला थारा नसला पाहिजे, पंरतू या उलट काही लोकांमुुळे ‘डीसीसी’ चा राजकीय अड्डाच बनला गेला आहे, राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या पंचायत राज संकल्पनेनुसार सामान्य जनतेला सत्तेचे विकेंद्रीकरण अपेक्षित आहे. तथापि, देशात आणि राज्यात ज्याठिकाणी बरीच वर्षे सत्तेचे केंद्रीकरण झाले आहे, त्या ठिकाणी अती तेथे माती, यानुसार, जनतेने अशा व्यक्तिना झुगारुन घरी बसवले आहे. जिल्हा बँकेच्या आताच्या निवडणूक पार्श्वभूमीचा विचार करता, सामान्य जनता स्वार्थासाठी सत्ताकेंद्रीत राजकारण करणाऱ्यांंना घरी बसवेल , असे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.
आम्ही कुणाच्या पॅनेलचे नसून आम्ही जनतेचे उमेदवार आणि प्रतिनिधी आहोत असे सुरुवातीलाच नमुद करत याविषयी अधिक मतप्रदर्शन करताना, खासदार उदयनराजे भोसले यांनी पुढे नमुद केले आहे की, इकडे मीच, तिकडे मीच, डीसीसीतही मीच अशा स्वार्थी पध्दतीचे सत्ता केंद्रीत विचार वारंवार दिसत आहेत. अशा प्रवृत्तींमुळे नावापुरती लोकशाही अस्तित्वात राहील आणि ते देशाला अत्यंत घातक आहे. या विरुध्द सत्तेचे विकेंद्रीकरण, पंचायत राज्य संकल्पना याविषयी जागृती घडविण्यासाठी यापूर्वीही अनेकदा भाष्य केले आहे, डीसीसीत नवीन चेहऱ्यांंना संधी देणे, सत्तेचे विकेंद्रीकरण, पक्षीय राजकारण विरहीत बँक अशीही भूमिका वेळोवेळी मांडली आहे, त्यामुुुळे अनेकांची कोंडी जरुर झाली ; पण कोंडी झाली तरी त्यांची खोडी काही केल्या जात नाही, अशी वस्तुस्थिती आहे. लोकांनाच आता अशा कोडगेपणाचा कंटाळा आला आहे. (प्रतिनिधी)