डोंगरमाथ्यावरील गावात जीवनावश्यक साहित्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:39 IST2021-05-23T04:39:40+5:302021-05-23T04:39:40+5:30
पेट्री : कासपठार परिसरातील जावली तालुक्याच्या दुर्गम व डोंगरमाथ्यावरील आखाडेमुरा (कुसुंबीमुरा) गावातील गरीब कुटुंबीयांना जीवनावश्यक साहित्याचे घरपोच वाटप करून ...

डोंगरमाथ्यावरील गावात जीवनावश्यक साहित्याचे वाटप
पेट्री : कासपठार परिसरातील जावली तालुक्याच्या दुर्गम व डोंगरमाथ्यावरील आखाडेमुरा (कुसुंबीमुरा) गावातील गरीब कुटुंबीयांना जीवनावश्यक साहित्याचे घरपोच वाटप करून बारांगळे कुटुंबीयांकडून सामाजिक बांधीलकी जपली जात आहे.
सविता बारांगळे या धनवडेवाडी (अंबेदरे) येथे तर संजय बारांगळे हे शाहूपुरी माध्यमिक विद्यालय, सातारा येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सविता बारांगळे यांनी दोन वर्षांपूर्वी कास परिसरातील मोळेश्वर येथे सेवा केली. त्यांनी येथील भौगोलिक तसेच भागातील लोकांची आर्थिक परिस्थिती जवळून पाहिली. कोरोनाकाळात सर्वत्र लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही तर पोटाची भूक कशी भागवणार, याचा जाणीवपूर्वक विचार करून कुसुंबीमुरा येथील आखाडेमुऱ्याच्या गरीब कुटुंबीयांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्याचे ठरविले. दोन किलोमीटर चिखलाचा डोंगर पायी तुडवत स्वतः या शिक्षक दाम्पत्य व मुलाने खांद्यावर, डोक्यावर साहित्याचे ओझे वाहत आखाडेमुरा येथील कुटुंबीयांना गहू, साबण, साखर, डाळी, तेल, लहान मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊ अशा साहित्याचे घरपोच वाटप शासन नियमांचे तंतोतंत पालन करत केले. राहूल मस्कर, वेदांत बारांगळे यांनीदेखील त्यांना सहकार्य केले.