ऊसतोड कामगारांच्या मुलांना कपडे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:03 IST2021-01-08T06:03:34+5:302021-01-08T06:03:34+5:30

शेंद्रे : शेळकेवाडी (ता. सातारा) येथील अंगणवाडी सेविका शकुंतला नारायण सूर्यवंशी यांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविताना ऊस तोडणी कामगारांच्या ...

Distribute clothes to the children of sugarcane workers | ऊसतोड कामगारांच्या मुलांना कपडे वाटप

ऊसतोड कामगारांच्या मुलांना कपडे वाटप

शेंद्रे : शेळकेवाडी (ता. सातारा) येथील अंगणवाडी सेविका शकुंतला नारायण सूर्यवंशी यांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविताना ऊस तोडणी कामगारांच्या मुलांना नवे कपडे तसेच खाऊचे वाटप केले. यावेळी संत तुकाराम महाराज वारकरी संस्थेचे अध्यक्ष संभाजी शेळके, अंकुश शेळके, महादेव शेळके, नथुराम शेळके, किरण शेळके, तसेच ग्रामस्थांची उपस्थिती होती.

पिकांना धोका

पुसेगाव : खटाव तालुक्याच्या उत्तर भागात गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत आहे. ढगाळ वातावरणामुळे व सकाळच्या दाट धुक्यामुळे कांदा, बटाटा, आले आदी नगदी पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. परिणामी उत्पादनात घट होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. डिसेंबरपासून थंडीचा जोर ओसरल्याने नगदी पिकांसाठी पोषक वातावरण तयार होते. त्यामुळे यंदा तरी खरीप हंगामाची नुकसानभरपाई वसूल होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र वातावरणातील बदल नुकसानीची चाहूल घेऊन आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

अपघाताचा धोका

सातारा : कोरोनात थांबलेली एसटीची चाके आता कुठे सुरळीतपणे रस्त्यावर धावू लागली आहेत. लांब पल्ल्याच्या एसटी बसमध्ये प्रवासी संख्या मर्यादित असल्याने या बसेस प्रवाशांच्या आग्रहानुसार महामार्गावरील सेवा रस्त्यांवर थांबत आहेत. सेवा रस्त्यावर दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू असते. त्यातच अशा अनधिकृत थांब्यामुुळे अपघाताचा धोका वाढला असून, अशा प्रकारावर तातडीने निर्बंध घालावेत, अशी मागणी होत आहे.

फुलझाडांची निगा राखावी

सातारा : महामार्गावरील दुभाजकांमध्ये शोभेसाठी फुलझाडांची लागवड करण्यात आली आहे. या झाडांचे संवर्धन व संगोपन करणे गरजेचे आहे; परंतु रस्ते विकास विभागाकडून या फुलझाडांची निगा राखली जात नसल्याने काही ठिकाणी झाडे वाळून गेली असून त्या जागी गवत व काटेरी झुडपे उगवली आहेत. त्यामुळे या झाडांची योग्य पद्धतीने निगा राखावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.

प्रवाशांमधून संताप

महाबळेश्वर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मेढा व महाबळेश्वर आगाराच्या एसटी बसचे वेळापत्रक गेल्या काही दिवसांपासून कोलमडले आहे. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. अनेकदा एसटी बसेसच्या फेऱ्या डिझेलअभावी होत नाहीत. अनेकदा डेपोमधील डिझेल संपते. असे विविध प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे योग्य नियोजन नसल्याने एसटीचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. याबाबत योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.

वक्तृत्व स्पर्धेत यश

सातारा : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद सातारा यांच्यावतीने कोल्हापूर विभागीय युवा महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन वक्तृृत्व स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या स्पर्धेत अंबवडे बुद्रुुक येथील नेहा राजेंद्र देवगुडे हिने प्रथम क्रमांक मिळविला. तिची राज्यस्तरीय वक्तृृत्व स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिला आर. वाय. जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल तिचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक केले.

शैलेश निकम यांची निवड

सातारा : जिल्हा न्यायालयातील अ‍ॅड. शैलेश आनंदराव निकम यांची भारतीय मराठा महासंघाच्या सातारा जिल्हा कायदेशीर सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती जिल्हाध्यक्ष विक्रम वाघ यांनी केली. निकम यांनी केली. अ‍ॅड. निकम यांनी यापूर्वी अनेक संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेतला असून ते विविध संस्थांचे कायदेशीर सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. निकम यांचे सागर पवार, मकसूद शेख, सुनील भिसे, अरुण खोत, नितीन शिंदे, रेश्मा घाडगे यांनी कौतुक केले.

झुुडपांचे साम्राज्य

किडगाव : पावसामुळे सातारा-वाई मार्गावर असेल्या वर्ये पुलाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली आहेत. या झुडपांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. प्रामुख्याने रात्रीच्या वेळी या झुडपांचा वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अधिक धोकादायक वळण, त्यात झुडपांचे साम्राज्य वाढल्याने वाहनधारकांची फसगत होत आहे. लॉकडाऊनमुळे या मार्गावरील वाहतूक सध्या बंद आहे. त्यामुळे बांधकाम विभागाने ही झुडपे तातडीने हटवावीत, अशी मागणी नागरिकांसह वाहनधारकांमधून होत आहे.

Web Title: Distribute clothes to the children of sugarcane workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.