आमदारांचे जवळचे कोण... पालिकेत वाद
By Admin | Updated: April 23, 2015 00:37 IST2015-04-22T23:56:55+5:302015-04-23T00:37:43+5:30
चव्हाण-पाटील यांच्यात वाकयुद्ध : फुटका तलावातील सुरक्षेवरुन शाब्दिक खडाजंगी--पालिका सभा

आमदारांचे जवळचे कोण... पालिकेत वाद
सातारा : सातारा पालिकेने ई-टेंडरिंगच्या ठेकेदारी पद्धतीवर चर्चा करण्यासाठी बुधवारी विशेष सभा बोलविली होती. मात्र, या सभेत नगरविकास आघाडीच्याच दोन नगरसेवकांमध्ये ‘आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या जवळचे कोण? या वरुन भलताच वाद झाला.’तसेच ई-टेंडरिंग पद्धतीवर काही मोजक्याच नगरसेवकांनी चर्चा करून दहा टक्क्यांऐवजी पाच टक्के जादा दरापर्यंत संबंधित ठेकेदारांना तडजोड करण्यास सांगावे, अशा सूचना मांडण्यात आल्या. या मुख्य विषयावर सभागृहात चर्चा झाल्यानंतर पालिकेचा तलाव दुरुस्त करण्यावरून नगरसेवक जयेंद्र चव्हाण, स्वीकृत नगरसेवक प्रवीण पाटील आणि रवींद्र पवार यांच्या चांगलीच खडाजंगी झाली.ई-टेंडरिंगच्या मुद्द्यावर चर्चा झाल्यानंतर स्वीकृत नगरसेवक प्रवीण पाटील बोलण्यासाठी उभे राहिले. फुटका तलाव येथे एका व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला. पालिकेचा जलतरण तलाव बंद असल्याने फुटक्या तलावात पोहण्यासाठी गर्दी होत आहे. त्यामुळे या तलावाच्या दुरुस्तीसाठी सर्व नगरसेवकांमध्ये निरुस्ताह का? पालिकेकडून तेथे सुविधा का उपलब्ध केल्या जात नाहीत. तेथे सुविधा देण्यात याव्यात, अशी मागणी केली. यावर नगरसेवक जयेंद्र चव्हाण यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. चव्हाण यांनी बोलण्याची सुरुवात ‘खोचक’ शब्दात सुरू केली.
‘प्रवीण पाटील हे सुशिक्षित आहेत. तसेच आमदारांच्या जवळचे आणि विश्वासू आहेत. आम्हाला सांगण्याऐवजी आपणही तलाव दुरुस्तीसाठी पाठपुरावा करावा. जलतरण तलाव हा एका वॉर्डचा विषय नसून संपूर्ण शहराचा आहे.’
हे ऐकून घेतल्यानंतर प्रवीण पाटील तावातावाणे जागेवरून उठले. आणि थेट डायसजवळ गेले. ‘मी विषय मांडत असताना एकमेकांच्या कानात कुजबूज करण्यापेक्षा नीट ऐकलं तर बरं होईल; कोण जवळचं आणि कोण दूरचं, हा इथे विषय नाही. नागरिकांच्या जीवाचा प्रश्न आहे. त्यामुळे सव्वा महिना तरी तलाव सुरू राहावा, ही अपेक्षा आहे. चव्हाण आणि पाटील यांच्यामधील शाब्दिक चकमक सुरू असतानाच नगरसेवक रवींद्र पवार यांनी त्यांच्या वादात ‘उडी’ घेतली. ‘आम्ही तर जिल्ह्यातून आलो नाही. आमच्या तीन पिढ्या फुटका तलाव परिसरात आहेत. कालच्या घटनेनंतर खासदार उदयनराजे यांनी ट्रस्टच्या खर्चातून फुटका तलावात सुविधा उपलब्ध करून द्या,’ असे सांगितले आहे. त्यानुसार तळ्याच्या भिंतीच्याकडेला लोखंडी पाईप लावण्याचे कामही सुरू झाले. यावर प्रवीण पाटील यांनी पालिकेच्या माध्यमातून सुविधा का नको, असा प्रश्न उपस्थित केला. पालिकेने तो जलतरण तलाव जाहीर करावा आणि काय सुविधा द्यायच्या आहेत, त्या द्याव्यात, असे रवींद्र पवार यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. तलाव पालिकेच्या मालकीचा असताना हे जाहीर करण्याची गरजच काय, असाही प्रवीण पाटील यांनी मुद्दा उपस्थित केला. दरम्यान, पालिकेच्या तलावाला खर्च जास्त असल्याने तो राज्य शासन आणि तेथून केंद्राकडे पाठविण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. परंतु हा तलाव पोहण्यासाठी सातारकरांना केव्हा खुला होणार, याची मात्र या सभेत कोणालाही हमी देता आली नाही. (प्रतिनिधी)
पंधरा विषयांना मंजुरी
सभेत ई-टेडंरिंगवर चांगलीच चर्चा रंगली. विरोधी पक्ष नेते अॅड. बाळासाहेब बाबर, अविनाश कदम, नगरसेवक रवींद्र पवार यांनी म्हणणे मांडले. सभेत विषय पत्रिकेवरील सर्वांच्या सर्व १५ विषयांना मंजुरी देण्यात आली. त्यात विविध निविदांबरोबरच शहरासाठी मोबाइल टॉयलेट व्हॅन, शहर स्वच्छता आराखडा, पर्यावरण अहवाल, कबड्डी स्पर्धा आयोजन या विषयांचा त्यामध्ये समोवश आहे.
प्रविण पाटील आमदारांच्या जवळचे
तुम्ही आमदारांच्या जवळचे असताना तुम्ही तलाव दुरुस्तीसंदर्भात पाठपुरावा केला पाहिजे, असा खोचक सल्ला नगरसेवक जयेंद्र चव्हाण यांनी प्रविण पाटील यांना दिल्यानंतर सभागृहातील सर्वजण अवाक झाले. मात्र, यानिमित्ताने नगरविकास आघाडीतील वाकयुद्ध समोर आले आहे.