‘रयत’चे संचालक मंडळ बरखास्त करा
By Admin | Updated: April 9, 2015 00:05 IST2015-04-08T22:48:44+5:302015-04-09T00:05:06+5:30
‘बळीराजा’च्या पंजाबराव पाटलांची मागणी; थकित ऊसबिलाची जबाबदारी कोण घेणार ?

‘रयत’चे संचालक मंडळ बरखास्त करा
कऱ्हाड : रयत साखर कारखान्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल, असे वाटत होते; पण संचालक मंडळाने सभसदांचे वाटोळेच केले. ‘कुमुदा’ला कारखाना चालवायला दिला असला तरी त्यावर अंकुश दिसत नाही. आपली जबाबदारी झटकाणारे संचालक मंडळ बरखास्तच करायला हवे याबाबत साखर आयुक्तांना निवेदन देणार असल्याची माहिती बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पंजाबराव पाटील बोलत होते. यावेळी उत्तम खबाले, दीपक पाटील, उत्तम साळुंखे, प्रताप कारंडे, सुभाष कदम, बाळासाहेब जाधव, राजेंद्र जाधव, सूरज पाटील, आबासाहेब जगताप आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पाटील म्हणाले, ‘रयत-कुमुदा’ने सन २०१४-१५ मध्ये गाळप केलेल्या उसाचे बिल आजअखेर दिलेले नाही. गत वर्षीही शेतकऱ्यांना आंदोलन केल्याशिवाय बिल मिळालेले नाही. त्यानंतर गाळप उसाची तयार झालेली सुमारे ३६ कोटींची साखर व्यवस्थापनाने गोदाममध्ये न ठेवता विकलेली आहे. कारखान्याच्या गोदाममध्ये समारे फक्त बारा कोटींची साखर शिल्लक आहे. ती साखरही पोलिसांच्या मदतीने उचलण्याचा प्रयत्न चालला आहे. कारखान्याकडून शेतकऱ्यांचे २४ कोटी ऊसबिल, तोडणी वाहतुकीचे चार कोटी व कारखाना कामगारांचे एक कोटी देणे असताना फक्त बारा कोटींची शिल्लक साखरही ‘कुमुदा’चे प्रशासक घेऊन गेले, तर शेतकऱ्याला एक रुपायाही मिळणार नाही. याबाबत प्रशासनाने लक्ष घालावे, म्हणून उपविभागीय अधिकारी किशोर पवार यांच्याकडे निवेदन दिले आहे. (प्रतिनिधी)
त्या पोलीस अधिकाऱ्याची चौकशी व्हावी
कारखाना व्यवस्थापनाला पोलिसांचे मोठे सहकार्य दिसते. आम्ही न्याय हक्कांसाठी भांडत असताना. कऱ्हाड तालुका पोलीस निरीक्षक एन. एस. जगताप यांनी आम्हा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनाच नोटिसा बजावल्या असून, त्यांना चुकीच्या पद्धतीने पोलीस बंदोबस्त दिला आहे. त्या अधिकाऱ्याची चौकशी व्हावी, अशी मागणीही पंजाबराव पाटील यांनी यावेळी केली.
कृष्णेतील सत्ताधाऱ्यांना मतदारच उत्तर देतील
कृष्णा सहकारी साखर कारखाना हा राज्यातील सर्वात कमी ऊसदर देणारा कारखाना ठरला आहे. एवढ्या मोठ्या कारखान्याला एफआरपी प्रमाणेही ऊसदर देता आलेला नाही. उगाच सभासदांना भोळी आशा दाखविली जात आहे. त्यामुळे सुज्ञ सभासद येत्या दोन महिन्यांत त्यांना योग्य उत्तर देतील, असेही पंजाबराव पाटील यांनी सांगितले. मात्र निवडणुकीतील आपली भूमिका त्यांनी गुलदस्त्यातच ठेवली.