धुणी-भांडी करूनही दहावीत मिळविले यश
By Admin | Updated: June 18, 2014 01:06 IST2014-06-18T00:49:45+5:302014-06-18T01:06:07+5:30
मलकापूरची पूजा ‘हौसाई’मध्ये टॉपर

धुणी-भांडी करूनही दहावीत मिळविले यश
मलकापूर : पहाटे अभ्यास, सकाळी धुणीभांडी, दिवसभर शाळा आणी रात्री घरकाम अशा परिस्थितीत मलकापुरातील पूजा सुरेश देसाई या विद्यार्थीनीने दहावी परीक्षेत नेत्रदिपक यश मिळविले. पूजाने ७० टक्के गुण मिळवून हौसाई कन्याशाळेत ‘टॉपर्स’मध्ये येण्याचा बहुमान मिळविला.
मलकापूरातील शास्त्रीनगरमध्ये पुजा आपली आई मंदा व पुनम, यश, गणेश या तीन भावंडांसमवेत वास्तव्यास आहे. काही वर्षापुर्वी शास्त्रीनगरमधील एका झोपडीवजा शेडात वास्तव्यास असताना पुजाचे वडील सुरेश देसाई यांचे निधन झाले. वडीलांचे छत्र हरपल्यानंतर पुजासह तीच्या कुटूंबाची मोठी वाताहत झाली. वडीलांच्या निधनानंतर पुजा व तीचे कुटूंबिय दुसऱ्या ठिकाणी राहण्यास गेले. वडीलांच्या अचानक जाण्याने घरातील मोठी मुलगी म्हणून सातवीत शिकणाऱ्या पुजावर कुटूंबाची जबाबदारी आली. आई मंदा या मोलमजुरीचे काम करू लागल्या. तर पुजा आईला सर्व कामांमध्ये मदत करीत राहिली.
आईसोबत काम करीत असतानाच पुजाने शिक्षणाकडेही लक्ष दिले. सातवी, आठवी व नववीच्या वर्गातही तीने चांगले गुण प्राप्त केले. दहावीत गेल्यानंतर मात्र तीने अभ्यासासाठी वेळ देण्यास सुरूवात केली. आई इतरांच्या घरामध्ये काम करीत असताना पुजा तीला मदत करण्यासाठी जायची. तेथील काम आटोपल्यानंतर दोघी रात्री यायच्या. जेवण आटोपल्यानंतर पुजा अभ्यास करत बसायची.
पहाटेही अभ्यासासाठी तीला लवकर उठावे लागत होते. सकाळी आई कामावर निघुन गेली की पुजा घरातील काम आटोपायची. त्यानंतर शाळा व सायंकाळी शाळेतून घरी परत आल्यानंतर आई येईपर्यंत घरातील सर्व काम आटोपण्याची जबाबदारी पुजावर असे. या परीस्थितीतही पुजाने मन लावून अभ्यास केला. (प्रतिनिधी)