धोम-बलकवडीचा पोटपाट चक्क चोरीस!
By Admin | Updated: December 1, 2015 00:20 IST2015-11-30T21:24:50+5:302015-12-01T00:20:03+5:30
धोम-बलकवडी : सोन्याची अंडी देणारी कोंबडीच खाल्ल्याची जोरदार चर्चा

धोम-बलकवडीचा पोटपाट चक्क चोरीस!
आदर्की : आदर्की परिसरात धोम-बलकवडीचे पाणी आल्याने जमिनींना सोन्याचा भाव आला आहे. बड्या धेंड्यांनी शेतातून गेलेला धोम-बलकवडीचा पोटपाट चोरून नेल्याने सोन्याची अंडी देणारी कोंबडीच कापून खाल्ल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
फलटण तालुक्याच्या आदर्की मंडलात कुसळाची माळे कवडीमोल किमतीने बड्या धेंड्यांना विकली. त्यावेळी धोम-बलकवडी कालव्याचा सर्व्हे सुरू होता. आदर्कीच्या माळावर १६ आॅक्टोबर २००० मध्ये कालव्याचे भूमिपूजन केले. त्यानंतर ३१ डिसेंबर २०११ रोजी दिवंगत चिमणराव कदम, शंकरराव जगताप यांच्या हस्ते झाले होते. परंतु पोट कालवा, वितरिका यांची कामे ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाची व अर्धवट कामे सोडून ठेकेदार गेले. त्यामुळे महसूल अधिकारी यांचे पोटकालव्याकडे दुर्लक्ष झाले.
त्याचा फायदा बड्या धेंड्यांनी घेऊन अगोदर धोम-बलकवडीचे हजारो ब्रास डबर, मुरूम चोरून नेला. त्यानंतर आता धोम-बलकवडी उजव्या कालव्यातून जमिनी ओलिताखाली आणण्यासाठी वितरिका, पोट-कालवे काढले; परंतु ठेकेदारांनी कालव्याच्या कामाबरोबर पोट कालव्याची कामे अपूर्ण ठेवून निघून गेले. यांचा फायदा घेऊन बड्या शेतकऱ्यांनी पोट कालव्याचे भराव मशीनच्या साह्याने ट्रॅक्टरद्वारे चोरून नेऊन खडकाळ जमिनीवर मुरूम, माती टाकली. धडदांड्यांनी इथे जणू सोन्याची खाणच सापडली आहे.काही ठिकाणच्या सिमेंट पाईप चोरून नेल्या आहेत. लाखोंचे माती-मुरूम चोरून नेऊनही अधिकारी व महसूल विभागाने गांधारीची भूमिका घेतल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
धोम-बलकवडी मुख्य कालव्याचे संपादन झाले आहे; परंतु पोट कालव्याचे भूमी संपादन झाले आहे. त्यामुळे कालवे ठेकेदारांकडे आहेत. - विनोद सावंत, मंडल अधिकारी आदर्की
धोम-बलकवडी पोटकालव्याची कामे निधीअभावी अर्धवट बंद आहेत. पोट-कालवे ठेकेदाराच्या ताब्यात आहेत. त्यामधील माती-मुरूम, सिमेंट पाईप चोरीला गेल्या तरी त्यांनी त्याची परत दुरुस्ती केल्याशिवाय बिले मिळणार नाहीत; परंतु पोट कालव्याचे भूमी संपादन झाले नाही, ज्यांचे उत्खनन होत असेल तर महसूल विभागाने संबंधितांवर कारवाई करण्याची गरज आहे.
- विश्वासराव माने, कार्यकारी अभियंता, धोम बलकवडी प्रकल्प