कोरोना लसीकरणानंतर आजारांची औषधे बंद करू नयेत : गौडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:41 IST2021-05-11T04:41:46+5:302021-05-11T04:41:46+5:30
सातारा : जिल्ह्यात कोरोना लसीकरण योग्य नियोजनाने सुरू आहे. नागरिकांनी लसीकरणानंतरही स्वतःच्या वैयक्तिक आजारांची दररोज सुरू असलेली औषधे बंद ...

कोरोना लसीकरणानंतर आजारांची औषधे बंद करू नयेत : गौडा
सातारा : जिल्ह्यात कोरोना लसीकरण योग्य नियोजनाने सुरू आहे. नागरिकांनी लसीकरणानंतरही स्वतःच्या वैयक्तिक आजारांची दररोज सुरू असलेली औषधे बंद करू नयेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी म्हटले आहे की, सध्या कोरोना लसीकरणाचा पहिला तसेच दुसरा डोस देण्याचे काम जिल्ह्यात सुरू आहे. या दरम्यान काही ठिकाणी असे निदर्शनास येत आहे की नागरिक स्वतःहून लसीकरणानंतर त्यांना असलेल्या मूळ आजारांची व सध्या सुरू असलेली औषधे सेवन करणे बंद करत आहेत. जर एखाद्या नागरिकास मधुमेह, उच्च रक्तदाब असा आजार असेल आणि त्याची औषधे सुरू असतील तर ती औषधे बंद करू नयेत. कोरोना लसीचा आणि औषधांचा संबंध नाही. फार आवश्यकता वाटल्यास वैद्यकीय तज्ज्ञांशी, डॉक्टरांशी बोलावे. परंतु स्वतःहून लसीकरणानंतर औषध सेवन बंद करू नये.
४५ वयावरील नागरिकांचे ५० टक्के लसीकरण सातारा जिल्ह्यात पूर्ण झाले असून त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे. यादरम्यान इतर आजार असणारे नागरिक लसीकरणानंतर स्वतःहून ही औषधे बंद करीत आहेत तसे न करता नागरिकांनी ती औषधे सुरू ठेवावीत. नागरिक लसीकरणाला शिस्तबद्धरीत्या आणि सकारात्मक प्रतिसाद देत आहेत तसेच प्रशासनाचे नियम जबाबदारीने पाळत आहेत, असेही मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी स्पष्ट केले आहे.