शस्त्रक्रियेवेळी वृद्धाचा डोळा निकामी

By Admin | Updated: June 1, 2016 00:53 IST2016-05-31T21:05:49+5:302016-06-01T00:53:51+5:30

कऱ्हाडातील प्रकार : डॉक्टरवर कारवाईची मनसेची मागणी

Disease of the eye during surgery | शस्त्रक्रियेवेळी वृद्धाचा डोळा निकामी

शस्त्रक्रियेवेळी वृद्धाचा डोळा निकामी

कऱ्हाड : मोतिबिंदू शस्त्रक्रिया करताना रक्तस्त्राव होऊन पाटण तालुक्यातील कुट्टे-पवारवाडी येथील एका वृद्धाचा डोळा निकामी झाला असल्याचा खळबळजनक प्रकार कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयात घडला असून, या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या दोषी डॉक्टरवर कारवाई करावी, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.रघुनाथसिंह पवार असे रुग्णाचे नाव असून, त्यांनी ढेबेवाडी ग्रामीण रुग्णालयात डोळ्याने दिसत नाही म्हणून दाखवले होते. त्यावेळी त्यांना कऱ्हाड येथील वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. २८ एप्रिल रोजी पवार यांच्या डोळ्याची मोतिबिंदूची शस्त्रक्रिया करत असताना डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे व चुकीच्या उपचार पद्धतीमुळे त्यांच्या डोळ्यातून रक्तस्त्राव होऊ लागला. यावेळी संबंधित डॉक्टरांनी पवार यांना तत्काळ मिरज येथे पाठवून खासगी रुग्णालयात उपचार करून रक्तस्त्राव थांबविला. परंतु या शस्त्रक्रियेमध्ये पवार यांचा डावा डोळा निकामी होऊन त्यांची दृष्टी गेली आहे. या प्रकरणात शस्त्रक्रिया करणाऱ्या संबंधित डॉक्टरांचा हलगर्जीपणाच कारणीभूत असून, दोषी डॉक्टरांवर वरिष्ठांनी कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन करेल, असाही इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला. मनसेचे तालुकाध्यक्ष दादा शिंगण यांनी वैद्यकीय अधीक्षक प्रकाश शिंदे यांना याबाबतचे निवेदन दिले
आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Disease of the eye during surgery