पारावर चर्चा... अन् आकड्यांवर पैजा!
By Admin | Updated: October 17, 2014 22:55 IST2014-10-17T21:21:54+5:302014-10-17T22:55:48+5:30
आमदार कोण? : माण-खटावसह कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील निकालाकडे अनेकांच्या नजरा

पारावर चर्चा... अन् आकड्यांवर पैजा!
सातारा : विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासून सातारा जिल्ह्यातील गावोगावी राजकीय वातावरण तापू लागले होते. निवडणूक काळात तर प्रचार शिगेला पोहोचला होता. बुधवारी झालेल्या मतदानानंतर निवडणूक निकालांकडे सर्वांच्या नजरा लागल्या असल्या तरी अमूकच आमदार होणार म्हणून पैजा लागू लागल्या आहेत. त्यातून कऱ्हाड दक्षिण, माण-खटावमध्ये जास्त प्रमाण आहे.
सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, साखर कारखानदारी राष्ट्रवादीकडेच असल्याने सातारा जिल्ह्याकडे आजवर कोणत्याच पक्षश्रेष्ठी गांर्भीयाने पाहिले नव्हते. बालेकिल्ला म्हणून राष्ट्रवादी तर आपला निभाव लागणार नाही, फुक्कट ताकद वाया घालवायला नको म्हणून सेना-भाजपने दुर्लक्ष केले. तर आघाडी असल्याने काँग्रेसच्या वाट्याला फारसे मतदारसंघच येत नव्हते.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच महायुतीत फाटाफूट तर आघाडीत बिघाडी झाली. त्यामुळे सर्वच विधानसभा मतदारसंघांत चौरंगी, पंचरंगी लढती झाल्या. त्यामुळे केवळ राष्ट्रवादीचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सातारा जिल्ह्यातील निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती. बहुतांश उमेदवारांनी प्रचारकाळात विरोधकांवर चिखलफेक करण्यात धन्यता मानली. त्यातील अनेकजण एकेकाळी मित्र पक्ष होते. त्यामुळे मतदारांची मात्र चांगलीच करमणूक झाली.
जिल्ह्यातील आठही मतदारसंघांसाठी बुधवारी शांततेत मतदान पार पडले. निवडणूक काळात प्रचारात गुंतलेल्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी विश्रांती घेणेच पसंत केले. निवडणूक निकालाविषयी उमेदवारांना जेवढी उत्सुकता लागली आहे. तेवढीच उत्सुकता कार्यकर्त्यांनाही लागली आहे. त्यामुळे कोण विजयी होणार याविषयी तर्क-वितर्क लावले जाऊ लागले आहेत. पंधरा दिवस वेगवेगळ्या उमेदवारांबरोबरच फिरत असलेले गावागावातील कार्यकर्ते आता कोठे एकत्र येऊ लागले आहे. त्यांच्यामध्येही आमचाच नेता विजयी होणार म्हणून दावे केले जाऊ लागले आहे. हे दावे करत असताना कोणत्या गावातील प्रचारसभांना कसा प्रतिसाद मिळाला. कोणत्या गावातून प्रतिसाद मिळाला नाही. कोणत्या भागातील कोणता नेता आपल्याबरोबर असल्याचे सांगत असला तरी आतून दुसऱ्याच उमेदवाराला पाठिंबा दिला होता. याचे दाखले देण्यात येऊ लागले आहेत.
कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारांच्या विजयाबद्दल दावे होत असतानाच चर्चा शिगेला पोहोचत असून, ती शेवटी पैजेपर्यंत येऊन थांबत आहे. यामध्ये विजयाची खात्री असलेल्या कार्यकर्ते चहाच्या पैजेपासून नास्टा, जेवण, दिवाळीच्या सुटीत लांब कोठे तरी फिरायला जाण्याचे नियोजन होऊ लागले आहे. हे करत असतानाच जो पैज हरेल त्यालाच खर्च करावा लागणार आहे. (प्रतिनिधी)
शासकीय कार्यालयांमध्येही याच गप्पा
विधानसभा निकालाविषयी राजकीय नेते, उमेदवार, कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे. तेवढीच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त उत्सुकता सर्वसामान्य मतदारांना लागली आहे. त्यामुळे मंडई, हॉटेलमध्ये चर्चा रंगू लागली आहे. त्याचप्रमाणे शासकीय, निमशासकीय कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांमध्ये निवडणूक निकालाविषयीच गप्पा रंगत आहेत. त्यांच्यातही लहान-मोठ्या पैजा लागत आहेत. पण, कऱ्हाड दक्षिण आणि माण-खटाव मतदारसंघात काय निकाल लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.